मुलीच्या चेह-यावर फुलले हास्य, शाळेने स्विकारले पालकत्व़़

124

विदर्भ वतन न्युज पोर्टल – नागपूर, कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यातच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशात गरीब कुटुंबातील मुलांनी ऑनलाइन शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा, हा यक्ष प्रश्न आहे. याच प्रश्नाला सामोरे जाणार्‍या एका चिमुकलीने मुख्याध्यापकांना भावनिक पत्र लिहिले. तिच्या पत्राची मुख्याध्यापक नीलेश सोनटक्के यांनी दखल घेतली आणि शाळेने तिचे पालकत्व स्वीकारले. यापुढील तिच्या शिक्षणाचा खर्च शाळाच करणार आहे. या कार्यात इतर शिक्षकही मदत करणार असून, यामुळे इशिकाच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.
इशिका भाजे असे चिमुकलीचे नाव आहे. ती अकरा वर्षाची असून, नरसाळा येथील सत्यसाई विद्यामंदिरात सहाव्या वर्गात शिकते. तिला एक मोठा भाऊ आहे. तो बारावीत शिकतो. दोघेही नरसाळा येथे आईच्या आई-वडिलांकडे राहतात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यावर कठीण वेळ आली आहे. मावशी आणि काकाची नोकरी गेल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचण येत आहे. घरची परिस्थिती पाहून इशिकाने मुख्याध्यापकांना मदतीसाठी पत्र लिहिले होते. पत्रात तिने ‘आम्ही दोघ बहीण-भाऊ आहोत. ऑनलाइन शिक्षणासाठी आम्हाला दोन मोबाईल घेऊन दिले आहेत. दोन्ही मोबाईलला महिन्याला ८00 ते १,000 रुपयांचा खर्च येतो. इतका खर्च करूनही इंटरनेट पॅक कमी पडतो. शाळेत शिकताना इतका खर्च येत नव्हता. हा खर्च करणे आम्हाला शक्य नाही. सर, परवडेल अशी उपाययोजना करावी. शाळेकडून काही होत नसेल तर सरकारकडून मदत होईल का? हे बघावे. जेणेकरून माझ्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल, ही नम्र विनंती, असा मजकूर लिहिला आहे. तिच्या पत्राची मुख्याध्यापकांनी दखल घेतली आणि शाळेने तिचे पालकत्व स्वीकारले. यापुढील तिच्या शिक्षणाचा खर्च शाळाच करणार आहे. या कार्यात इतर शिक्षकही मदत करणार आहे. यामुळे इशिकाच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.