
विदर्भ वतन न्युज पोर्टल – नागपूर, नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रशांत पवार आणि दुनेश्वर पेठे या दोन नावांवर चर्चा सुरू झाली होती. अखेर पेठे यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पेठे यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपयर्ंत पोहोचविण्यासाठी दुनेश्वर पेठे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला. नागपूर शहर आणि जिल्ह्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या. अनिल अहिरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शहराध्यक्षपदी जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्याची निवड होईल, असे सांगण्यात येत होते. महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. शहराध्यक्ष म्हणून नगरसेवक दुनेश्वर पेठे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. जुने, नवीन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन त्यांना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

