१४ लाख ६९ हजारांचा गांजा जप्त

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9953*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188

१४ लाख ६९ हजारांचा गांजा जप्त

मानकापूर, कळमन्यात कारवाई : ४ आरोपींना अटक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मानकापूर व कळमन्यात केलेल्या कारवाईत एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २ कार आणि ३ मोबाईल मिळून एकूण २६ लाख ९९ हजार ८२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकाने मानकापूर हद्दीतून ५ लाख ३0 हजार ८५0 रुपयांचा ३५ किलो ३९0 ग्रॅम गांजा आणि कळमना हद्दीतून ९ लाख ३८ हजार ९७0 रुपयांचा ६२ किलो ५९८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला सुनील मालवी व सोहेल खान हे दोन इसम त्यांच्याजवळ असलेल्या एमपी २८ / सीए २३८७ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने छिंदवाडा येथून गांजा घेऊन नागपूरला येत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. नमूद क्रमांकाची कार येताच तिला पोलिसांनी अडविले. आरोपी सोहेल खान वल्द शमीम खान (वय २२, रा. वॉर्ड नं. २६, पातालेश्‍वर वॉड, झिलपुरा, छिंदवाडा, मध्यप्रदेश) आणि सुनील बसंत मालवी (वय ३१, रा. वॉर्ड नं. २0, जुना पॉवरहाऊस जवळ, झिलपुरा छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. यावेळी कारची झडती घेतली असता डिक्कीत पोत्यामध्ये एकूण ३५ किलो ३९0 ग्रॅम गांजा आढळला. या प्रकरणी मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल करून ५ लाख ३0 हजार ८५0 रुपयांचा गांजा, कार आणि २ मोबाईलसह एकूण १२ लाख ५0 हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्हय़ातील आरोपी नरेश उर्फ पप्पू जगदीश प्रसाद श्रीवास्तव (रा. ओमनगर, भरतवाडा, नागपूर) हा फरार आहे. कळमना येथील घटनेत ८ जून रोजी गुन्हे पथकाने अजित सिंग नावाचा इसम कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंग रोडवरील धारगाव शिवार, महामार्ग सर्व्हिस रोडवरील उड्डाणपुलावरून एक युपी ७६ / एम ३0७१ क्रमांकाची गाडी जात असताना संशय आल्याने तिला अडविले. आरोपी अजित सिंग राकेश सिंग (वय २९, रा. सेक्टर १६ नोएडा, जेजे कॉलनी, काली मंदिरजवळ, नोएडा, उत्तरप्रदेश) आणि दिलीपकुमार शहा रामबहादूर शहा (वय ३५, रा. वॉर्ड ७, जि. सहरसा, बिहार) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारच्या डिक्कीमध्ये २ पोत्यामध्ये एकूण ६२ किलो ५९८ ग्रॅम गांजा आढळला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.