उत्तर प्रदेशात बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9913*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

243

उत्तर प्रदेशात बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : कानपूर – उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे काल रात्री साडे आठच्या सुमारास बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी बस कामगारांना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून गुजरातला घेऊ जात होती. तर जखमी व्यक्तींनी ते कानपूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे सांगितले आहे. जखमींपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यात काम करणारे कामगार आहेत. हे कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यात जात असतानाच हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने मदत करण्याचे आणि जखमींवर उपचारासंदर्भातील निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश योगींनी दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधील अपघातात मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातलगांना राष्ट्रीय मदतनिधीतून २ लाख रुपये देण्याची घोषणा केली असून जखमींना ५० हजारांची मदत केली जाणार आहे’, असे म्हटले आहे.