
पंतप्रधानांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना आणि कोरोना संकटात जनता होरपळत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राजधानी दिल्लीत सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित असतील.
या भेटीसाठी उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती.
मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा
सकाळी 7 वाजता : विमानाने दिल्लीकडे प्रयाण
सकाळी 9.45 वाजता : महाराष्ट्र सदन येथे आगमन
सकाळी 11 वाजता : मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत बैठक
स्थळ: प्रधानमंत्री निवास, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली
बैठकीनंतर सोयीनुसार विमानाने मुंबईकडे प्रयाण

