
१८ कामगारांचा होरपळून मृत्यू; मुळशीच्या कारखान्यातील आग पुन्हा भडकली
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : पुणे – पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून 15 महिलांसह 18 कामगारांनी आपला जीव गमावला, तर काही कामगार बेपत्ता असून १९ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. भयानक म्हणजे या आगीवर नियंत्रण मिळवून रात्री उशिरापर्यंत कुलिंग झाल्यानंतरही आज सकाळपासून गोदामातील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र सध्या अग्निशमन दलाची कोणतीही यंत्रणा घटनास्थळी नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दुरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग अधिकच भडकली. आगीमागील नेमकं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आगीत होरपळून 18 कामगारांचा मृत्यू झाला. डीएनए टेस्ट केल्यानंतरच या कामगारांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. डीएनए टेस्ट पूर्ण होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येतील.
दरम्यान, ‘पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे’, असे म्हणत ‘मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल’, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

