
बदलापुरात रासायनिक कंपनीत गॅस गळती, नागरिकांना श्वास घेण्यास अडचण
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : बदलापूर – बदलापूरमध्ये एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक कंपनीत काल रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास गॅस गळती झाली होती. रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्याने ही गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांना उलट्या, मळमळ आणि श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
बदलापूरच्या एमआयडीसीत काल (4 जून) रात्री जवळपास 10.22 मिनिटांनी रासायनिक कंपनीत गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी भागात अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसेच या घटनेनंतर परिसरात मोठी घबराट पसरली. जवळपास दोन तासांनी म्हणजे रात्री 11.24 मिनिटांनी अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या ही परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.
बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीएट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री ही गॅस गळती झाली. या रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं. मात्र त्यावेळी यात सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्याने अचानक रिऍक्टरमधून गॅस लीक झाला. त्यानंतर काही क्षणातच हा गॅस आजूबाजूच्या परिसरात पसरला.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात
हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणं, डोळे जळजळणं असे त्रास होऊ लागले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ही गळती रोखण्यात आली. त्याशिवाय रिऍक्टरचं कुलिंग ऑपरेशन केलं. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच सध्या ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.

