
अद्विक बहुउद्येशिय संस्थेचा “एक हात मदतीचा”.
विदर्भ वतन, भंडारा : सामाजिक कर्तव्य पार पाडणे हे फार मोठे दिव्य आहे.आज स्वत: पुरते जगणा-यांचे प्रमाण समाजा मध्ये फार जास्त आहे. पण अजुनही असे काही लोक आहेत जे स्वत: सोबतच इतरांनाही मदत करण्यात आपली धन्यता मानतात आणि अशा नि:स्वार्थी लोकांच्या उत्तम कार्यामुळेच समाजात चांगुलपणा टिकून आहे. आज कोरोना माहामारीच्या काळात रक्ताची नातीही दुरावले गेले आपण पाहत आहोत अशा वेळी लोकांच्या मदतीला सदैव धावून, त्यांच्या दु:खात आपल्या सहकायार्ने व वस्तूरूप मदत करून सुखाचे काही क्षण मिळवून देतात ही खरचं आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. आणि हे कार्य करीत आहे वाकेश्वर येथील अद्विक बहुउद्येशिय संस्था.
महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यात दुस-या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. याचा ताण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडुन रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.त्यातच शासनाच्या वतीने संचार बंदी लावण्यात आली.अशावेळी रूग्णांच्या नातेवाईकांचे खाण्यापिण्याचे चांगलेच हाल होवू लागलेत.परंतु मानव धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. असे मानून या संस्थेच्या वतीने गरजवंतांना मदत करायला सुरुवात केली.
एक सामाजिक बांधिलकी जपत अद्विक बहुउद्येशिय संस्था वाकेश्वर च्या वतीने “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत शहरातील शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालय, कोरोना पेशंट व त्यांचे नातेवाईक, पोलीस, नर्स, डॉक्टर, होम कोरोनटाईन व्यक्ती, निराधार व्यक्ती त्याच प्रमाणे झोपडपट्टी व गरजूंना मोफत नियमित एक महीना सकस आहार व सैनिटाईझर, मास्क, शरबत, वितरण केल्या जात आहे. यामध्ये विविध प्रकारचे सकस भोजन स्वत: च्या हाताने तयार करून दहा स्वयंसेवक निस्वार्थ सेवा देत आहेत. संस्थेचे अध्यक्ष/संस्थापक अनिल दिघोरे यांच्या नेतृत्वात राहूल वाघाडे, प्रशांत वाघधरे, आकाश थानथराटे, संस्था सचिव धनश्री दिघोरे, श्वेता ठवकर, प्रगती सुखदेव, नीशा समरीत, निकिता देशकर,भुमेश्वरी देशमुख आदी सर्व निस्वार्थपणे सेवा देत आहेत. कोरोना महामारीच्या काळात स्व:ताच्या जीवाची पर्वा न करता गरजवंतांसाठी धावून जाणारे हे कोरोना योध्दे नक्कीच समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या कायार्ला परमेश्वर सतत बळ देवो हिच सदिच्छा व्यक्त करूया.

