
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू, आयएमएकडून आकडेवारी जाहीर
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशाला बसला आहे. या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीवलग गमवावे लागले. त्याचप्रमाणे कोरोना योद्धांनाही या लढाईत आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. आयएमएकडून राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.
गेल्यावर्षी फेब्रुवारीपासून देशात कोरोनाचा कहर सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत देशात एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर, आयएमएने दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत १७ डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत.
रामदेवबाबांमुळे कोरोनाविरोधातील लढाईला नुकसान
दरम्यान योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना आयएमएने खुलं पत्र लिहिलं असून त्यांनी कोरोनाविरोधातील सरकारच्या लढाईला नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. रामदेव बाबा यांनी देशातील लोकांमध्ये कोरोनासंबंधी प्रोटोकॉल आणि लसींसंबंधी गोंधळ निर्माण केला असल्याचं सांगत आयएमएने ही देशविरोधी भूमिका असल्याचा उल्लेख केला आहे.
रामदेव बाबा यांनी आपल्या वस्तूंच्या प्रसिद्धीसाठी संधी साधत कोरोना उपचारांवरील प्रोटोकॉल आणि लसीकरण मोहिमेविरोधात ही वक्तव्यं केली असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. सध्याच्या आणि माजी १४ अध्यक्षांची स्वाक्षरी असणाऱ्या या पत्रात रामदेव बाबा यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या भारत सरकारच्या प्रयत्नांना नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात देशद्रोह तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी आयएमएने केली आहे.

