Home आंतरराष्ट्रीय जुन्या जमान्यातील गायिका कुंदा बोकील

जुन्या जमान्यातील गायिका कुंदा बोकील

0
जुन्या जमान्यातील गायिका कुंदा बोकील

जुन्या जमान्यातील गायिका कुंदा बोकील

जुन्या जमान्यातील गायिका कुंदा बोकील यांचा जन्मदिन व स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३० मे रोजी बडोदा येथे झाला. कुंदा भागवत हे त्यांचे लग्नानंतरचे नाव. त्यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद येथे झाले. कुंदाताईंना शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात गाण्याची संधी मिळत गेली. वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे हे कुटुंब इंदूर येथे आले.

इंदूरच्या संगीत विद्यालयाचे मुख्याध्यापक पंतवैद्य यांच्याकडे कुंदाताईंना शास्त्रीय गायन शिकण्याची संधी मिळाली. पुढील काळात गुरू महावीर प्रसाद यांच्याकडे त्या गजलगायकीचे तंत्र शिकल्या. १९५५ साली, म्हणजे कुंदाताईंच्या वयाच्या सोळाव्या वर्षी इंदूर आकाशवाणीने त्यांच्या गायनाचा पहिला कार्यक्रम केला. दिल्लीच्या अखिल भारतीय सुगम गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यामुळे मुंबईत आल्यावर आकाशवाणीसाठी गाण्याची त्यांना संधी मिळाली. ‘भावसरगम’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमातील कुंदा बोकील यांची गीते लोकप्रिय झाली. आकाशवाणीच्या दिल्ली, जम्मू, श्रीनगर, लखनौ, जयपूर, नागपूर या केंद्रांवरही गाण्याची संधी मिळाली. कुंदाताईंनी केवळ मराठीच नाही, तर गुजराती, पंजाबी, कोकणी भाषेतील गीतेही गायली. खळेसाहेबांनी एच.एम.व्ही. कंपनीसाठी केलेली आणि कुंदा बोकील यांनी गायलेली ‘शाळा सुटली पाटी फुटली’आणि ‘गम्माडी गम्मत जम्माडी जम्मत ये गं ये सांगते कानात’ ही गीतेसुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्या काळात गंगाधर दांडेकर यांचे ‘संगीत पुनर्मीलन’हे नाटक मुंबईतील साहित्य संघात सादर झाले होते. ‘गीत शाकुंतल’ या विषयावर आधारित ती कलाकृती. त्याचे संगीत प्रभाकर पंडित यांनी केले होते. त्यात स्नेहल भाटकर, शरद जांभेकर यांच्यासह कुंदाताईंनी गायलेली गाणी होती. त्यातील कुंदाताईंच्या गीतांना रसिकांची पसंती मिळाली. कुंदाताईंचा चित्रकलेचा पैलू हा फार कमी लोकांना माहिती आहे. बांद्रा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी या विषयाचे रीतसर शिक्षण घेतले. निसर्गचित्रे, पोट्र्रेट्स हे त्यांच्या आवडीचे होते.

कुंदा बोकील यांचा भावगीत गायनावर स्वतंत्र विचार होता. त्या सांगत : ‘भावगीत गायन ही स्वतंत्र आणि नाजूक, तशीच अवघड कला आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया हवाच. आवाज जितका लवचीक तितकाच स्पष्ट हवा. चोरटय़ा आवाजात गाणे म्हणजे भावगीत हा गैरसमज आहे. साडेतीन- चार मिनिटांच्या भावगीतात स्वर, शब्द, भावना या मुख्य गोष्टींसाठी आवाजावर ताबा असावाच लागतो.’

अभिमानाने मीरा वदते, गमाडि गंमत जमाडि जंमत, नको ताई रुसू, निळासावळा नाथ तशीही, प्रीतीचा पारिजात फुलला, या चिमण्यांनो परत फिरा रे, वैकुंठीचा राणा तूचि, शाळा सुटली पाटी फुटली, सखि बघ अघटित घडले ग, सदैव सैनिका पुढेच जायचे, हा मंद मंद वारा, हे चांदणे ही चारुता ही गाणी आकाशवाणीवर नेहमी ऐकायला मिळतात काही मोजकी गाणी गाणाऱ्या पण ती सर्व अजरामर करणारी कुंदा बोकील या गेले काही दशकं रसिक श्रोत्यांपासून, गायन क्षेत्रापासून आणि त्याबरोबर असणाऱ्या झगमगाटापासून दूर एक साधं-सरळ आयुष्य व्यतीत करत होत्या. कुंदा बोकील यांचे ३० मे २०१५ रोजी निधन झाले.

– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३