
नागपूरच्या नीरी संस्थेने विकसित केले मीठाच्या पाण्याने गुळण्यांच्या माध्यमातून कोविड आरटी-पीसीआर चाचणी करणारे अभिनव रुग्ण-स्नेही उपकरण
स्वॅब न घेता केवळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून निष्कर्ष देणारी सुलभ, जलद आणि किफायतशीर चाचणी
“केवळ तीन तासांत निष्कर्ष मिळतो, ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी अधिक सोयीस्कर”
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नागपूर- कोविड-19 महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच, भारतात या आजाराच्या चाचण्या करण्यासाठीच्या पायाभूत क्षमता आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहेत. नागपूरची राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या मार्गदर्शनाखाली, या चाचण्यांच्या संशोधन प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या संस्थेने कोविड-19 च्या नमुना चाचणीसाठी ‘मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून होणारी आरटी-पीसीआर पद्धत’ शोधून काढली आहे.
गुळण्या करण्याच्या पद्धतीचे अनेक लाभ आहेत, सगळे लाभ या एका छोट्या उपकरणातून मिळतात. हे उपकरण अत्यंत सुलभ, जलद, किफायतशीर, रुग्ण-स्नेही आणि आरामदायक आहे.या उपकरणामुळे जलद निकाल मिळतात आणि ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे कारण, या चाचणीसाठी किमान पायाभूत सुविधांची गरज असते.
पत्र सूचना कार्यालयाशी बोलतांना, नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार म्हणाले, “स्वॅब गोळा करण्याच्या पद्धतीला वेळ लागतो. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे, हे आत साधन घालून, स्वॅब काढण्याचे तंत्रज्ञान असल्याने, रुग्णांसाठी ते जरा त्रासदायक असते. त्याशिवाय, काही दुर्गम, ग्रामीण भागातून, गोळा केलेले नमुने संकलन केंद्रांत आणण्यासाठी वेळ जातो. दुसरीकडे मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत ही जलद, आरामदायक आणि रुग्ण-स्नेही पद्धत आहे. त्याचे नमुने लगेच संकलित केले जातात आणि निष्कर्ष तीन तासांत मिळू शकतात.”

