
पीएनबी बँकेत १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याला अखेर अटक
-
डोमिनिकामध्ये ठोकल्या बेड्या
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – पीएनबी बँके १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याला अखेर अटक करण्यात आली आहे. डोमिनिका देशात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून सध्या तो क्रिमिनिल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (सीआईडी)च्या ताब्यात आहे.
मेहुल चोक्सी हा भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये वास्तव्याला होता. मात्र याठिकाणाहून रविवारपासून तो फरार होता. त्यामुळे अँटिग्वा पोलिसांनी त्याची शोध मोहीम सुरू केली होती. तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. परंतु डोमिनिकामधून त्याला अटक करण्यात आली आहे. आता अँटिग्वातील पोलीस डोमिनिका पोलिसांच्या संपर्कात आहेत.
दरम्यान, पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८मध्ये मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी याने भारतातून पलायन केले होते. चोक्सी कॅरेबियन देश अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून बसला होता. मात्र अँटिग्वा न्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, चोक्सी रविवारपासून बेपत्ता झाला होता. रविवार, २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो त्या ठिकाणी दिसला नाही, त्यामुळे पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरू केला होता. आज तीन दिवसांनी अखेर पोलिसांना चोक्सीला पकडण्यात यश आले.

