Home इतर ● संस्कारांची पेरणी करणारा बालकविता संग्रह  – माझे गाणे आनंदाचे ● डॉ....

● संस्कारांची पेरणी करणारा बालकविता संग्रह  – माझे गाणे आनंदाचे ● डॉ. भाऊसाहेब मिस्तरी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9512*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

94 views
0

● संस्कारांची पेरणी करणारा बालकविता संग्रह  – माझे गाणे आनंदाचे

                      ● डॉ. भाऊसाहेब मिस्तरी
(बाजार सावंगी, औरंगाबाद)

          बालसाहित्य लिहितांना पालकाला बालक होता यायला हवं असं मला मनापासून वाटतं. ज्या कोणाला हे खऱ्या अर्थाने जमलं तो खरा बालसाहित्यिक ! त्यांच्या लेखणीतून उत्तमोत्तम असं बालसाहित्य निर्मिती होत असते ही माझी समज आहे.  साने गुरूजी वयाने मोठे होते तरी ते मुलांमध्ये मुल होऊन ‘श्यामची आई’ सारखी  ‘संस्कार गाथा ‘ सांगून गेलेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ती महत्त्वाची आहे.
समकालीन मराठी साहित्यात काही बालसाहित्यिक यांची नावे पटकन आठवतात. आबा महाजन,उत्तम कोळगावकर, एकनाथ आव्हाड, दासू वैद्य, पृथ्वीराज तौर अशी नावे सहजपणे ओठांवर येतात. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून किरण केंद्रे सरांच्या हातून  ‘किशोर ‘ मासिकाच्या माध्यमातून मोठे काम होत आहे. बालसाहित्यिक म्हणून आता डॉ. कैलास दौंड यांचे नाव लक्षात राहील . त्यांचा  ‘माझे गाणे आनंदाचे’ हा बालकविता संग्रह नुकताच  प्रकाशित झाला आहे. यात सदोतीस कविता आहेत. डॉ. दौंड यांचे या आधी प्रकाशित झालेले साहित्य : ‘ उसाच्या कविता,’ ‘ वसाण,’ ‘ भोग सरू दे उन्हाचा,’ ‘ अंधाराचा गाव माझा,’  हे चार कविता संग्रह.
पाणधुई,कापूसकाळ,तुडवण तीन कादंबऱ्या तसेच ‘एका सुगीची अखेर,’ कथासंग्रह आणि ‘ जाणिवांची फुले,’ बालकुमार कथासंग्रह आहे.  आत्ताच प्रकाशित झालेला   ‘माझे गाणे आनंदाचे’ हा बालकविता संग्रह माझ्या वाचण्यात आला. यातल्या अनेक कविता या मुलांच्या कायम लक्षात राहतील अशा आहेत. यातली ‘इवले इवले फूल’ ही कविता आपण बघू या-
‘इवले इवले फूल
बाई, इवले इवले फूल
या वेलींच्या मांडीवरती
जसे खेळते मूल.

ओठ लालेलाल
त्याचे गाल लालेलाल
पिवळ्या- पिवळ्या परागाची
शेंडी झुबकेदार
जीवा पाडते भूल’
किती सुंदर ,सहज कल्पना या कवितेत कवीने मांडली आहे. आईच्या मांडीवर जसं मुल तसं वेलीच्या मांडीवर खेळते फूल. वाह! अजून काही वानगीदाखल कविता सांगता येतील जसं “वाढ बाई वाढ ” ही कविता आपण बघू या-
‘वाढ बाई वाढ
पाणी वाढ
उंच होईल
दारातलं झाडं !

  वाढ बाई वाढ
त्याला खत काला
येईन खूप
झाडाला पाला.

  पाला बाई पाला
  थांबेल उन्हं
  हसतील तेव्हा
  पानांत फुलं !’
ही कविता नुसती कविता राहत नाही तर निसर्गाविषयी प्रेम सांगून जाते. बालमनात या कवितेच्या माध्यमातून संस्काराची पेरणी केली गेली आहे. अजून अशा अनेक कविता या संग्रहात मुलांच्या आणि मोठ्यांच्या लक्षात राहतील अशा आहेत. आपल्या घरातील मुलांच्या हाती  नक्कीच  द्यायला हवा असा हा संग्रह  आहे. या पुस्तकाची पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची आहे. सुंदरसे मुखपृष्ठ धर्मराज आव्हाड  यांचे आहे. बालवाचक नक्कीच या बालकविता संग्रहाचे स्वागत करतील. डॉ. कैलास दौंड यांना भावी लेखनासाठी मी खूप शुभेच्छा देतो.

● ‘माझे गाणे आनंदाचे’:  बालकविता संग्रह.
• कवी : डाॅ. कैलास दौंड
•प्रकाशक: अनुराधा प्रकाशन,पैठण,औरंगाबाद
• प्रथमावृत्ती : १४नोव्हेंबर २०२०
• पृष्ठे : ४४  मूल्य: ५०₹/-

~~~
● डॉ. भाऊसाहेब मिस्तरी
बाजार सावंगी, औरंगाबाद
मो.9960294001