गडचिरोलीचे जाँबाज सी सिक्स्टी कमांडो –  कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9449*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

243

गडचिरोलीचे जाँबाज सी सिक्स्टी कमांडो 

  लेखक  कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

शुक्रवार, २१  मे,२०२१च्या भल्या पहाटे,महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या कोटमी पोलीस ठाण्यातील एटापल्ली जवळच जंगल, रायफल फायरच्या आवाजानी दणाणून गेल. त्या क्षेत्रात तेंदू पानांच्या लिलाव झाला होता त्या व्यवहारामधील नक्सल्यांच्या ३० टक्के हिस्स्याची खंडणी घेण्यासाठी,कसनसूर नक्सल दलमचे  जवळपास ६०- ७० नक्सली, गुरुवारी रात्रीच पैदि गावा जवळ आले होते. तेंदू पत्त्याच्या लिलावामधून नक्सली,गडचिरोली जिल्ह्यातून अंदाजे १६० कोटी रुपयांची खंडणी गोळा करतात. नक्सली रात्री तेथे येणार असल्याची पक्की बातमी  (रिअल टाईम इंटलिजन्स),सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस, गडचिरोली,श्री  अंकित गोयल यांना गुरुवारी सकाळीच मिळाली होती.त्यांनी तत्काळ ही खबर,त्या  क्षेत्रातील स्टेट अँटी नक्सल ऑपरेशनचे वरिष्ठ अधिकारी,श्री  समीर शेख व भाऊसाहेब ढोले यांना दिल्यावर,जिल्ह्यातील नक्सल विरोधी विशेष अभियान पथक पथडीच्या जंगलात पाठवल.सकाळच्या रामप्रहरी पोलिसांना नक्सल्यांच्या अचूक ठिकाण्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी नक्सल्यां भोवती आपला वेढा घातला.हे सर्व,गडचिरोलीच्या सी सिक्स्टी कमांडो पथकाचे निधडे,जाँबाज कमांडो होते.

भारतीय सेनेतून  निवृत्त झाल्यावर २००६-०७मधे, तत्कालीन एसपी,श्री शिरीष जैन यांच्या कार्यकाळात, तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या धोरण प्रणालीनुसार,या तगड्या कमांडोंना गडचिरोली जवळील जंगलात,कमांडो अटॅक, अम्बुश ब्रेकिंग आणि स्फोटक विरोधी कारवाईच प्रशिक्षण  देण्याची संधी मला मिळाली होती.या शिवाय नक्सल सेलच्या पाय रोवणीतही माझा खारीचा वाटा असल्यामुळे या युनिट आणि त्यामधील वीरांबद्दल मनात अजूनही ममत्वाची भावना आहे.

१९८०च्या दशकात गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या क्षेत्रात नक्सली कारवायांमधे प्रचंड वृद्धी झाली.त्याला आळा घालण्यासाठी डिसेंबर, १९९०मधे, गडचिरोलीचे तत्कालीन एसपी श्री के पी रघुवंशी यांनी,एस व्ही गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या पोलीस दलामधील साठ,अतिशय काटक,तगड्या व फायरिंगमध्ये प्रवीण तरुणांच “सी सिक्स्टी कमांडो पथक” स्थापन केल.“वीर भोग्या वसुंधरा” हे सी सिक्स्टीच ब्रीदवाक्य आहे. जिल्ह्यांतर्गत नक्सल प्रभाव वाढल्यामुळे १९९४मधे जिल्ह्याची  विभागणी,उत्तरेत गडचिरोली आणि दक्षिणेत प्राणहिता पोलीस उपविभागात करण्यात येऊन,प्राणहिता उपभागासाठी दुसर सी सिक्स्टी कमांडो युनिट उभ करण्यात आल.आजमितीला गडचिरोलीत ४०० सी सिक्स्टी कमांडो कार्यरत आहेत.नक्सल्यांचा कर्दनकाळ असलेल्या या पथकातील प्रत्येक जाँबाज कमांडो,गडचिरोली जिल्ह्यातील नक्सल चळवळीला आळा घालण्यासाठी नि:संशय अथक परिश्रम करतो.

अति दुर्गम, संवेदनशील,पहाडी जंगलांमधे; ऊन, वारा, पाऊस, दिवसरात्र येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या कमांडोंना,शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम असावच लागत.त्यासाठी आधी,निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या सहाय्यानी या योद्धयांना,स्थानीय स्तरावर प्रशिक्षण दिल्या जात असे.मात्र आजमितीला उच्च, विशेष व आधुनिक तंत्रज्ञानाच प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना; ग्रे हाउंड्स ट्रेनिंग सेंटर,हैदराबाद;एनएसजी ट्रेनिंग सेंटर, मनेसर; बिहार मिलिटरी पोलीस सेंटर,कांकेर आणि/किंवा  अनकन्व्हेन्शनल ऑपरेशन्स ट्रेनिंग सेंटर,नागपूर येथे पाठवल्या जात.शारिरिक दृष्ट्या सक्षम राहण्याकरीता दररोज सकाळी त्यांचे; शारिरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच नक्सल विरोधी अभियानात अग्रेसर राहण्यासाठी त्यांना वेळोवेळी नक्सली  अमलात आणत असलेले नवनवीन डावपेच आणि त्याला त्याला काट म्हणून नक्सल  विरोधात आवश्यक असणार सामरिक ज्ञान, मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी  मनोवैज्ञानिक व्याख्यान तसच या विषयावरील चित्रपट दाखवले जातात. हे कमांडो, जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात,अति दुर्गम पहाडी जंगलांमधे नक्सल विरोधी अभियान राबवतांना, नक्सली कुटुंबियांच प्रबोधन व मदत तर करतातच पण या व्यतिरिक्त ते;नक्सली हालचालींची माहिती देणारे खबरे शोधून त्यांच संगोपन करण आणि त्यांच्याद्वारे आत्मसमर्पणाच्या विविध सरकारी योजना नक्सल्यांपर्यंत  पोचवण्याच कामही करतात.

२०००  साली सी सिक्स्टीकच्या मदतीसाठी, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल युनिट्सची स्थापना झाली. याच प्रत्येकी एक पथक,सी सिक्स्टीच्या गडचिरोली व प्राणहिता उपमुख्यालयात आहे.नक्सली इम्प्रोव्हाइझ्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी)/क्रूड बॉंब (गावठी स्फोटक)/माईन्स  (भूसुरुंग) शोधून त्यांना ध्वस्त करणे आणि   पोलीसांना रोड ओपनिंगमधे मदत करणे हे त्यांच प्रमुख काम आहे.त्याच प्रमाणे;गडचिरोली जिल्हायात कार्यानुभव प्रशिक्षणासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित करणे, घडलेल्या आयईडी/भूसुरुंग/बाँब विषयक घटनांचा आढावा  घेऊन त्यावर मार्गदर्शन करणे आणि नक्सली वापरत असलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल सर्किट्स व स्विचेसची माहिती कमांडो/पोलिसांना देणे ही देखील त्यांची जबाबदारी आहे. यातील जवान; उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञ असतात.या शिवाय;जिल्ह्यात नव्यानी आलेले पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांना नक्सल विरोधी अभियान प्रशिक्षण, विविध हत्यारी गोळीबाराचा सराव,नक्सली रणनीतीला  प्रत्युत्तर रणनीतीची निर्मिती आणि विविध ठिकाणी नक्सल विरोधी कार्यशाळांच आयोजन;त्यांच्या कार्यपद्धतीचा अभिन्न हिस्सा आहे. बीडीडीयू व्यतिरिक्त सी सिक्स्टीत,नक्सल डोझियर आणि नक्सल क्राईम ब्रांच असलेला नक्सल सेल आहे.दरवर्षी नक्सल प्रोफाइल अपडेट,अटक झालेल्या नक्सल्यांची खानेसुमारी, गावबंदी/ नक्सल बंदीचा लेखाजोखा,नक्सली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांच निवृत्ती वेतन आणि नक्सल्यांवरील इनामाची वसुली  ही या सेलची जबाबदारी आहे.

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या वायव्येस असून त्यात; ४५७ ग्रामपंचायती,बारा तालुके आणि १६८८ गाव आहेत.जिल्ह्यात;गोंडी,मडिया,मराठी,हिंदी,तेलगू,बंगाली व छत्तीसगढी भाषा बोली प्रचलित आहेत.तेलंगणाच्या दोन व छत्तीसगडच्या चार जिल्ह्यांच्या सीमांना लागून असलेल्या गडचिरोलीत नक्सल्यांची वट आहे.जिल्ह्यात; गडचिरोली,कुरखेडा,धनोरा,घोट,अहेरी,सिरोंचा,एटापल्ली आणि इटापल्ली या आठ पोलीस सब डिव्हिजन,१४ पोलीस स्टेशन,१४ सब पोलीस स्टेशन आणि १४आर्म्ड पोलीस आऊट पोस्ट्स आहेत. येथे एकूण अंदाजे ३१०० पोलीस कार्यरत आहेत.अती घनदाट जंगलांनी समृद्ध असलेल्या या जिल्ह्याच्या दक्षिण भागात,पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी  गोदावरी आणि तिच्या; वैनगंगा,वर्धा आणि इंद्रावती या उपनद्यांची खोरी आणि टेकड्या आहेत. जिल्ह्याच्या एकूण १४,४१२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील ११,६९४ चौरस किलोमीटर (७८ पूर्णांक ४८ टक्के) क्षेत्र, जंगल व्याप्त आहे.या जंगलातील सुरक्षित जागा, या नक्षल्यांचे अभेद्य गढ आहेत.या जंगलांच्या आश्रयानी राहाणाऱ्या नक्सल्यांना हुडकून त्यांचा नाश करण खरच कठीण काम आहे. याच जंगलांच्या आडोशात नक्सली; महाराष्ट्र,तेलंगणा आणि छत्तीसगढमधे बे रोखटोक ये जा/भ्रमण करतात.या नवीनतम नक्सली चकमकीनंतर आता महाराष्ट्र सरकार,या भ्रमण संस्कृतीला आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याची विंनती केंद्र व या दोन्ही राज्यांना करणार आहे ही सूत्रांची माहिती आहे.

एटापल्ली,कोटमी,पैदि हे  गडचिरोलीतील अति संवेदनशील क्षेत्र आहे. एकपरींनी हा “नक्सली सेफ झोन” आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही. या अविकसित क्षेत्रात कसनसूर दलमचे नक्सली क्रियाशील आहेत. या क्षेत्रामधील जारखंडी,कोटमी,पैदि व पोटेगाव या गावांमधले बहुतांश तरुण नक्सली चळवळीत सामील झाले आहेत.पण त्याच वेळी नक्सली अत्याचाराला बळी पडलेल्यांची संख्याही बरीच असल्यामुळे खबरही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.तेंदू पत्त्याच्या व्यवहारातील त्यांचा हिस्सा,खंडणी,वसूल करण्यासाठी कॉम्रेड सतीश मोहंदाच्या नेतृत्वात नक्सली, मेच्या तिसऱ्या आठवड्यात कटोमीच्या जंगलात येणार आहेत ही कुणकूण पोलीसांना लागली होती.त्याच्या सच्चेपणाची खात्री करण्यासाठी पोलीस,या बातमीचा सतत पाठपुरावा करत होते.गुरुवारी सकाळी बातमीची खात्री झाली आणि एसपी अंकित गोयल यांनी अटॅक ऑपरेशन प्लॅन केल. त्यानुसार,गडचिरोली व अहेरी पोलीस स्टेशनमधून सी सिक्स्टीचे २४० जाँबाज कमांडो आपल्या मोहिमेवर निघालेत.या आधी एप्रिलमधे सी सिक्स्टीनी याच लोकांना कोरकुटी गावाजवळ दबोचण्याचा प्रयत्न केला होता तो असफल झाला.या वेळी मात्र ते सफल होण्याच्या दुर्दम्य आशेनी मोहिमेवर निघाले. नक्सल्यांनी तलावा शेजारच्या खडकाळ टेकडीवर आपला  कॅम्प लावला होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कमांडोंनी त्या टेकडीसमेत तलावाला वेढा घातला. असली वार करायच्या आधी कमांडोंनी एरिया रेकी केली.

केलेल्या रेकीच्या अनुषंगानी,कमांडोंनी नक्सल्यांच्या संभाव्य  पळवाटा (प्रॉबेबल एक्झिट पॉईंट्स)  बंद (प्लग/सील) केल्यात. नक्सल्यांना पोलीसांची चाहूल लागताच त्यांनी फायर सुरु केल. कमांडोंनी देखील जबाबी फायर केल.ही धुमश्चक्री जवळपास सव्वा तास सुरू होती हळूहळू टेकडीवरून होणार फायरिंग बंद झाल. वाट पाहून कमांडो,सावधानपूर्वक टेकडीवर गेलेत. सर्च ऑपरेशनमधे  त्यांना आठ पुरुष आणि सात महिलांची पार्थिव मिळालीत.त्या सर्वांवर एकूण बासष्ट लाखांच इनाम आहे. पैदि गावातील एक शरणागती पत्करलेल्या माजी नक्सल्याकडून पोलीसांनी पार्थिवांची ओळख पटवली. त्यात;सतीश मोहंदा,रुपेश गावडे व रमाक्का हे तीन प्रख्यात आतंकवादी नक्सल सामील आहेत.त्या बरोबरच एक एके ४७ रायफल,पाच सेल्फ लोडिंग रायफल्स,तीन ३०३ रायफल्स,एक कार्बाईन,चार चीनी पिस्तूल,बारा पिठठू,सात आयईडी,व्यक्तिगत साजो सामानाचे सोळा पीठठू आणि मोठ्या प्रमाणात गोळा बारूद व नक्सली पत्रक/साहित्य मिळाल. बाकीचे नक्सल दाट जंगलाच्या आडोशाने निघून जाण्यात सफल झाले असले तरी जंगलाकडे जाणाऱ्या  मार्गांवर पडलेल्या रक्ताच्या सड्यावरून, या ऍक्शनमधे किमान सोळा सतरा नक्सली जखमी झाले असल्याचा दावा कमांडोंनी केला आहे. गोळीबारात जखमी झालेले/जीवाच्या भीतीनी लपलेले नक्सली आणि त्यांचे उर्वरित मृतदेह शोधून काढण्यासाठी जंगलातल सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.मारल्या गेलेल्या नक्सल्यांची संख्या वाढण्याचा संभावना मोठ्या आहेत. सी सिक्स्टीचा एकही कमांडो या कारवाईत साधा जखमी देखील झाला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्त्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी कमांडो आणि एसपी अंकित गोयल यांच कौतुक केल आहे. २०२१मधे सी सिक्स्टी कमांडोंनी २२ नक्सल्यांना यमसदनी पाठवल असून सहा कॅम्पस नष्ट केले आहेत.

सी सिक्स्टी कमांडोंच्या कारवाईला एवढ घवघवीत यश मिळण्यामागे खालील कारण आहेत. एक)  या वेळी पोलीसांना नक्सली हालचालींची अग्रीम सूचना मिळाली होती आणि पोलीस मुख्यालयानी खात्री पटेस्तोवर त्याचा चिवट पाठपुरावा केला; दोन) एसपी,अंकुश गोयलनी पोलीस योजना/हालचालींची भनकही काही अधिकारी सोडता कोणालाच लागू दिली नाही. गृहमंत्री/पालकमंत्री आपल्या काही कामांसाठी नागपूरमधेच असूनही त्यांना याची कल्पना ऑपरेशन संपल्यावरच देण्यात आली. “इंटलिजन्स शेयरिंग ओन्ली ऑन नीड टू नो बेसीस” वर झाल्यामुळे ऑपरेशनल  लीकेज अजिबात झाल नाही; तीन) या ऑपरेशनमधे केवळ सी सिक्स्टी कमांडोंचाच  सहभाग होता. त्यामुळे “सॅंक्टिटी अँड  फायटिंग सिनर्जी ऑफ ए होल युनिट” शाबूत राहिली व सर्व पोलीस यश मिळवण्याची जिद्द व इर्षेनी लढलेत. इतर प्रांतांमधे एका ऑपरेशनसाठी सहा ते सात प्रकारच्या पोलीसांचा वापर केल्यामुळे स्पेक्टर ऑफ वननेस अँड युनिफाईड कमांड” या प्रणालीचा बोऱ्या वाजतो; चार) पोलिसांची संख्या जेवढ्यास तेवढी (मिनिमम रिक्वायर्ड) होती. त्यामुळे “फायर डिसिप्लिन अँड फायर फॉर इफेक्ट” अमलात आणल्या गेला. मोठ्या संख्येत,विविध युनिट्सचे पोलीस असले की होऊ शकत नाही; पाच)  कमांडोंना थोड्या समय अंतराने (डिफ्रण्ट टाइम फ्रेम), दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून पाठवण्यात आल. हल्ल्याच्या ठिकाणी त्यांचा समन्वय झाला आणि कोणतीही चाहूल न लागता त्यांनी नक्सल्यांभोती वेढा आवळला.असा समन्वय,कठोर व सखोल प्रशिक्षणामुळे अंगी बाणतो;  सहा) वेढा घालतांना व फायरिंगच्या जागा पकडतांना (टेकिंग पोझिशन) जी काळजी घेतल्या गेली त्यामुळे सव्वा तास फायरिंग होऊनही कमांडोंना एकही जीवहानी पत्करावी लागली नाही. त्यांचे फक्त दोनच जवान साधारण जखमी झालेत.हे उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाला उजागर करत; सात) ज्या प्रकारे ऑपरेशन पार पडल त्या वरून कमांडो टीम्स व मुख्यालय आणि “इंटर्नल कम्युनिकेशन विदिन डिफरंट अटॅकिंग पार्टीज” किती प्रभावी असेल/होत याची कल्पना करता येते; आठ)  पोलिसांनी जी सामरिक अचूकता आणि डावपेचात्मक सफाईनी हे ऑपरेशन केल त्या वरून त्यांच अगदि  थोड्या वेळात, किती प्रभावी विवेचन व दिशानिदर्शन  (ब्रिफींग अँड ऑपरेशनल डायरेक्शन) झालं असेल हे लक्षात येत; नऊ) ज्युनिअर लीडरशिप किती प्रभावी,कनिष्ठांवर वचक असणारी आणि सामजिक दृष्ट्या प्रशिक्षित आहे याची कल्पना येते आणि दहा) “सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेल्युअर हॅज नन” या उक्तीला खोट ठरवत,गडचिरोलीत केवळ अपर पोलीस अधीक्षक आणि नागपूरमध्ये फक्त गृहमंत्र्यांनीच पत्रकार परिषदांना संबोधित केल. इतर कोणीही आपली टिमकी वाजवली नाही. हे प्रोफेशनल मॅच्युअरटीच लक्षण आहे. हे भविष्यातही असच राहील अशी आशा करायला मोठाच वाव आहे.

गडचिरोलीच्या सी सिक्स्टी कमांडोंच हे घवघवीत यश त्यांच्या डोक्यात जाता उपयोगी नाही. त्यांनी ही एक चकमक जिंकली आहे. भारतातून नक्सलवादाच समूळ उच्चाटन होईपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. एका चकमकीत पीछेहाट झाल्यामुळे,नक्सल्यांची युद्ध क्षमता संपुष्टात आली/येते आहे (टर्मिनल स्टेज) असा निःकर्ष त्यांना झेलाव्या लागलेल्या शस्त्र/ जीवहानीवरून काढल्या गेल्यास ते चूक असेल. महाराष्ट्रातील नक्सली सध्या सामरिक संयमाच (स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट) अनुकरण करताहेत हा निःकर्ष मात्र यातून निघू शकतो.मिळालेल्या यशामुळे सी सिक्स्टी कमांडोंनी हुरळून जाऊ नये कारण “गेन्स सो अक्रुड शुड बी कंटिन्यूअसली कन्सॉलिडिटेड थ्रू अग्रेसिव्ह ऑपरेशन्स,इफ दे आर नॉट टू बी इरोडेड. टिल देन ब्राव्हो सी सिक्स्टी कमांडोज”

२४/५/२१ : १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१० : ९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com.