
दिलीप कुमार, राज कपूर यांच्या हवेली ऐतिहासिक वास्तू घोषित
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : पेशावर – भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार दिलीप कुमार आणि दिवंगत राज कपूर यांच्या पेशावर येथील हवेली पाकिस्तानने पुरातन वास्तू म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामुळे आता या वास्तूंचे संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारच्या पुरातत्व विभागाने हवेलीच्या मालकांना 2 कोटी 30 लाख रुपये दिले असून त्या वास्तू त्यांच्याकडून खरेदी केल्या आहेत. दिलीप कुमार आणि राज कपूर यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान मोठे आहे.
त्यांच्या आठवण म्हणजे या 2 हवेली आहेत. त्या पाकिस्तान सरकारने खरेदी केल्या आहेत. त्यांच्या हस्तांतरणाचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सरकार या पुरातन वास्तूंची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती आणि मजबुती करणार आहे. मात्र त्यात त्यांच्या मूळ ढाच्याला कोठेही धक्का लावला जाणार नाही, असे खैबर पख्तूनख्वाचे पुरातत्व व्यवस्थापक अब्दुस समद यांनी सांगितले. खैबर पख्तूनख्वा सरकारने राज कपूर यांची हवेली 1.5 कोटींना आणि दिलीप कुमार यांची हवेली 80 लाखांना खरेदी केली आहे.
राज कपूर यांच्या हवेलीचे सध्याचे मालक अली कादिर यांनी 20 कोटींची तर दिलीप कुमार यांच्या घराचे मालक गुल रहमान मोहम्मद यांनी 3.5 कोटींची मागणी केली होती. राज कपूर यांचे आजोबा दिवाण बश्वेश्वरनाथ कपूर यांनी 1922 मध्ये ही हवेली बांधली आहे. दिलीप कुमार यांचेही घर याच भागात आहे.

