पी-305 बार्ज दुर्घटना! मृतांचा आकडा पोहचला 61 वर 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने समुद्रात बुडालेल्या पी-305 बार्ज आणि वरप्रदा बोटीवरील बेपत्ता कर्मचार्‍यांच्या सुटकेच्या आशा मंदावल्या असल्या तरी भारतीय नौदल, तटरक्षक दलासह तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाकडून अद्याप शोध मोहिम सुरू आहे. आज शनिवारी आणखी एका कर्मचार्‍याचा मृतदेह सापडला. तर काल संध्याकाळपर्यत 11 जणांचे मृतदेह हाती लागले होते. आतापर्यत बार्ज बोटीवरील 61 कर्मचार्‍यांचे मृतदेह मिळाले असून त्यापैकी 31 मृतदेहांची ओळख पटलेली आहे, 28 मृतदेह संबंधित नातेवाईकांना देण्यात आले आहेत. अजूनही 30 जणांची ओळख पटत नसल्यामुळे त्यांचे डीएनएचे नमुने घेतले जात आहेत. तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या पी 305 या बार्जवर मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदल अजूनही काम करत आहे. या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाकडून समुद्रात खोलवर जाऊन कर्मचार्‍याचा शोध घेतला जात आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस मकरची मदत घेतली जात आहे.. दरम्यान पी 305 बार्जवर काम करणार्‍या मुस्तफिजुर रहमान शेख यांच्या तक्रारीवरुन बार्जचा कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात येलोगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मात्र तोक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी 305 चा कॅप्टन राकेश बल्लव हा अद्यापही नौदलाच्या बचाव व शोध मोहीम कामादरम्यान आढळून आलेला नसून सध्या तो बेपत्ता आहे.

दरम्यान, ओएनजीसीकडून दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा बेपत्ता असलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, तर वाचलेल्या 188 कर्मचार्‍यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती ओएनजीसीकडून देण्यात आली आहे.

You missed