‘तुडवण’ मधून समकाळाचेच चित्रण-डाॅ. कैलास दौंड.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9414*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

980

‘तुडवण’ मधून समकाळाचेच चित्रण.

   – डाॅ. कैलास दौंड.

             ‘तुडवण ‘ ही कादंबरी २०१९ सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झाली. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे वाचकांनी चांगले स्वागत केले.  ‘पाणधुई’ आणि ‘कापूसकाळ’ यांच्या नंतरची ही माझी तिसरी कादंबरी आहे. या कादंबरीत आजच्या खेड्यातील तरुणांची घुसमट आणि धडपड यातुन स्वतःला उभे करण्याची कसरत मी मांडली आहे.
सन २०१०~१२ या काळात मी काही कथा लिहील्या होत्या. त्यातील चार कथेत अंतर्सूत्र आणि पर्यावरण एकच असल्याचे लक्षात आल्याने त्यांना कादंबरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासंबंधाने लेखन सुरू केले.
नवनाथ आणि राधाक्का हे शेतकरी जोडपे. त्यांना नारायण आणि यमुना ही अपत्ये आहेत. नारायण डि. एड. झालेला आहे तर यमुनाचे शिक्षण  दहावी झाल्यावर थांबलेले आहे. या कुटुंबाला एक गाय व थोडी शेती आहे. ‘सिंदाडाची पट्टी’ व ‘पाउतका’ ही त्यांच्या  शेताची नावे. नारायण  सीईटीत नापास होतो. नोकरीसाठी त्याला एके ठिकाणी पैसे मागितले जातात. तो वडिलांना शेती विकण्याचा सल्ला देतो आणि वडिलांच्या शिव्या खातो. नंतर तो जगण्यासाठी चंदनचोरी, ट्रक क्लिनर, ड्रायव्हर असे वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत राहतो. त्यानिमित्ताने शहर आणि त्याचा तिथला वावर, त्याचे अनुभव समोर येतात. पुन्हा शेत विकून टेंपो घेण्याचा विचार त्याच्या मनात जोर धरतो. यावेळी आई त्याला मदत करते. गावातील धनदांडगे शेत विकत घेतात. नवनाथ मात्र त्यानंतर दुःखी होऊन घरातून कायमचाच निघून जातो. नारायणला त्यामुळे अपराध्यासारखे वाटते. तो पुन्हा एकदा जमीन घेतो आणि त्यात त्याला फसवले जाते. उपजीविकेसाठी तो एका विहिरीवर कामाला गेलेला असतांना अपघात होतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. दूर्दैव असे की ही विहीर त्याच्या विकलेल्या शेतातच असते.  त्यानंतर त्याची पत्नी आणि आई यांच्यात कुरबुरी होऊ लागतात. राधाक्का तिच्या सुनेच्या वडीलांना ‘मी नातवाला सांभाळते. तुमची मुलगी तरूण आहे. तिचा पुन्हा प्रपंच उभा करू शकता. ‘ असे सांगते आणि  सुनेचे वडीलही तिला घेऊन जातात.
यादरम्यान कितीतरी घटना प्रसंग ‘तुडवण’ कादंबरीत येतात. त्यात  यमुनीचे बालपण, तिची मैत्रीण रुपली हिचे अपंग भावाला सांभाळणे, शेतात जाण्याचा प्रसंग, ट्रकवर जाण्याचा प्रसंग, राधाक्कावर गुजरलेला प्रसंग हा तर भयानकच आहे असे प्रसंग अपवादाने का होईना पण घडलेले आहेत , लग्नाचे प्रसंग, नवनाथचा निघून जाण्याचा प्रसंग, सप्ताहाचा प्रसंग, मुलाखतीचा प्रसंग, गाय विकण्याचा प्रसंग, चारा छावणीचा प्रसंग, शाळा डिजिटल करण्यासाठी वर्गणी मागणारे शिक्षक व सरपंच भेटण्याचा प्रसंग, कारण नसताना घेतलेली बुलेट गाडी चोरीची निघण्याचा प्रयत्न, शेती व्यवहारात फसवले जाण्याचा प्रसंग , अखेरीस नातवाला घेऊन राधाक्काचा शहराचा रस्ता धरण्याचा प्रसंग असे एक ना अनेक प्रसंग कादंबरीत समाज, भोवताल आणि माणूस यांच्यातील गुंतागुंतीचे व्यवहार समोर मांडतात.
‘तुडवण’ मध्ये प्रामुख्याने नारायण या शिक्षित तरुणाची अगतिकता, अभावग्रस्तता आणि त्यातुन सुटण्याची धडपड दिसते. हे खरेच परंतू हा केवळ ‘तुडवण’ कादंबरीमधील आशयाचा एक पैलू आहे. येथे नवनाथ आणि राधाक्काचे शेतकरी कुटूंब दिसते. रूपली या यमुनाच्या मैत्रिणीचे मेंढपाळ कुटूंब दिसते. सुखादुखात मदतीला धावणारे गाव दिसते. तसेच आपल्याच भावकीशी भांडणारेही लोक दिसतात. एखाद्या शुल्लक गोष्टीचा डूख धरून दुसर्‍याच्या जीवाशी खेळणारे म्होरके दिसतात. पैशावाल्यांचे पैसे घेऊन नोकर्‍या देणारे संस्थाचालक दिसतात ,जवळच्या नात्यातील बंध दिसतात. शेजारधर्माला जागणारी रूपली दिसते ,शेतीत जीव पाखडणारा आणि आपल्या दोरीत चालणारा नवनाथ भेटतो ,आपल्या मनातील बंधूप्रेमाचा पत्ता न लागू देणारी बहीण यमुनी येथे भेटते , ट्रक ड्रायव्हर मधील माणूस येथे भेटतो. गावातील माणसाबद्दल जिव्हाळा बाळगून असलेला अधिकारी सुभाषराव भेटतो. अश कितीतरी व्यक्तिरेखांनी ‘तुडवण’ला जीवंत केले आहे.
कादंबरीभर जगण्याला बळ देणारी, आघात पचवत तग धरणारी आणि सारे काही संपल्यासारखे वाटत असतांनाच नव्या अंकूराला प्रकाश दाखवणारी सोशिक ,  संयमी आणि करारी राधाक्का भेटते. साधेपणाने कष्ट करत जगणारा निरागस रोह्यल्या इथे भेटतो.
गावाचे एक सेंद्रीय रूपच कादंबरीतून समोर येते. इथे झाडे, नदी, रस्ते आहेत मात्र ते सगळे माणसांच्या आधाराने येतात . मानव निर्मित आणि नियतीचा यादृच्छिक आघात झेलणारी माणसे इथे भेटतात.
आजच्या कठीण काळात अनेक लोक आपापल्या मूळ गावी स्थलांतर करत आहेत. तुडवण कादंबरीतील नारायणचे देखील शहर आणि गाव असे अनेकदा स्थलांतर होते. स्थलांतर ही जशी आर्थिक क्रिया आहे तसेच भाषिक वापर ही देखील  सामाजिकतेसोबतच आर्थिक क्रिया आहे.
भाषा ही माणसाच्या अस्तित्वाची खुण आहे. त्यातही बोलीभाषा हा तर जिवंतपणाचा झरा आणि बहुसंख्य माणसाची अस्मिता असते. मात्र प्रमाणभाषा ही जशी ‘आहे रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करते तशी बोलीभाषा खासकरून ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करते. तुडवणं कादंबरीच्या संदर्भात नारायण,  त्याचे वडील नवनाथ,  बहीण यमुना, मेहुणा तुकाराम आणि आई राधाक्का या जवळपास ‘नाही रे’ वर्गातील म्हणता येतील अशा समूहातील लोकांचे चित्रण  आहे पण ते केवळ एवढ्याच दोन- तीन  कुटुंबाचे चित्रण आहे असे मात्र नाही.  कारण त्या अनुषंगाने एकूणच ग्रामीण समाजाचे चित्र आणि नारायण च्या निमित्ताने शहरी मानसिकतेचे चित्रण,  त्याचबरोबर गावातील सरपंच, शाळा मास्तर  या व अशा मध्यम वर्गीय लोकांचेही चित्रण ‘तुडवण’ मध्ये प्राधान्याने आलेले आहे. खरे पाहिले तर ही आजच्या काळाची कादंबरी आहे. वर उल्लेख केलेल्या त्रिस्तरीय समाजाची भाषादेखील त्रिस्तरीय असल्याचे कादंबरी दिसते.  या कादंबरीतील ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे कुटुंब बोलीभाषेत व्यक्त होतात, निम्न मध्यम वर्गीय ठरतील असे लोक आपले आर्थिक आणि राजकीय तसेच सामाजिक स्थान वेगळे आहे हे दाखवण्यासाठी प्रमाण भाषेचा आधार घेतात, त्यांच्या भोवतीचे लोक मात्र बोलीभाषेत बोलत असतात आणि शहरी लोक त्यातही ‘आहे रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे लोक प्रमाणभाषेत संवाद साधतात.
तुडवण मध्ये ग्रामीण जगण्याचे,  तिथल्या समस्यांचे, बेरोजगारीचे, बेभरवशाचे, हतबलतेचे चित्रण तर येतेच त्यासोबतच हव्याहव्याशा वाटणाऱ्या चंगळवादाचे आणि आर्थिक दुर्बलतेचे चित्र प्रामुख्याने येते.  कादंबरीत आपल्याला मराठीच्या नगरी बोलीचे  जीवंत व प्रभावी  स्वरूप पहावयास मिळते.  अनेकांनी या भाषेबद्दल आस्था दाखवली असून तिचे विशेष कौतुक केलेले आहे. कादंबरीकार म्हणून लोकांच्या आकलनास  बाधा येऊ नये म्हणून लेखकाने कादंबरीच्या अखेरीस पाथर्डी, शेवगाव, जामखेड, शिरूर, आष्टी या भागात बोलल्या जाणाऱ्या नगरी बोलीभाषेतील शब्दांची सूची जोडलेली आहे. त्यामुळे सहाजिकच बोलीच्या संवर्धनास हातभार लागतो व समाजाची बहुस्तरीय रचना आणि बहुस्तरीय भाषिक वापर याचीही कल्पना येते. भाषेचे स्वरूप व भाषेचा वापर या   व्यवहाराला सामाजिकतेबरोबरच आर्थिक किनार असते. ते भान लेखक म्हणून ‘तुडवण’ सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचक आणि अभ्यासकांच्या प्रतिक्रियांचे स्वागतच आहे.

       डॉ. कैलास दौंड (कादंबरीकार)
kailasdaund@gmail.com
Mo. 9850608611