Home Breaking News शासनाच्या मदतीची वाट न पाहता कढोलीच्या गावक-यांचा कोरोनावर विजय!

शासनाच्या मदतीची वाट न पाहता कढोलीच्या गावक-यांचा कोरोनावर विजय!

230 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – कोरोनाच्या महामारीत शासनाकडून योग्य ती मदत मिळत नाही म्हणून राज्यभर नागरीकांसह रुग्णांची ओरड सुरू आहे. शासनही मोठ्या प्रमाणात कमी पडते आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरीक उपचाराच्या प्रतिक्षेत अथवा आधारहिन आहेत. अशातच नागपुर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कढोली या पाच हजार लोकवस्तीच्या गावातील लोकांनी मात्र पक्ष, जातीभेद विसरुन एकजुट केली. लोकवर्गणी गोळा करुन आवश्यक ती साधन सामग्री खरेदी करीत गावातील शाळेतच २० खाटांचे कोविड सेंटर तयार केले. कोरोना होऊच नये म्हणून कठोर पाऊले उचलुन, गाव निर्जंतूक करणे, सोशल डिस्टन्सींग व मास्क वापरातून कोरोनाला गावातून हद्दपार केले आहे. यामुळे गेल्या दिड वर्षात कढोली गावात केवळ १५ जण कोरोना बाधीत झाले. यातील केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांपासून गावात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळुन आलेला नाही. राज्यभरात भीतीचे वातावरण असताना कढोली गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विशेष समिती, गावकºयांनी केलेले हे प्रयत्न व त्यातून आलेल्या सकारात्मक परिणामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबुन न राहता गावकºयांनी लोकवर्गणी, स्वयंशिस्तीच्या जोरावर कोरोनाला गावातून हद्दपार केले आहे.
प्रांजल राजेश वाघ या कढोली गावाच्या महिला सरपंच आहेत. ग्रामपंचायतीत सहा महिला व तीन पुरूष सदस्य आहेत. गेल्यावर्षी कोरोना महामारीस सुरूवात झाली तेंव्हा इतर गावांप्रमाणे कढोलीतील लोक देखील दहशतीत होते. याचवेळी सरपंच प्रांजल वाघ यांनी गावातील माजी सरपंच, सदस्य यांच्या अनुभवाचा फायदा गावकºयांना व्हावा या उद्देशाने त्यांना सोबत घेत विशेष समिती स्थापन केली. या समितीत सरपंच वाघ यांच्यासह माजी सरपंच अशोक घुले, रवी रंगारी, नानु ठाकरे, ज्ञानदेव गावंडे, मनोहर ठाकरे, विनोद वासनीक, टेकराम मोहल्ले, दिनेश ढोले, बबलु पाटील, राजेश वाघ, अमर सहारे, सारिका सहारे, अलका निकाळजे, मिनाक्षी वाघ व ग्रामसेवक ब्रह्मानंद खडसे यांचा सहभाग आहे. या सदस्यांनी एकत्र आल्यानंतर सर्वप्रथम लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तासाभरात लोकांनी ७० हजार रुपये गोळा केले. याच पैशातून समितीने गावातील शाळेत २० खाटांचे कोरोना सेंटर सुरू केले. अतिदक्षता म्हणून तीन आॅक्सीजन सिलेंडर खरेदी करुन तेथे ठेवण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातून दररोज एक आरोग्य सेवक आणि खाजगी डॉक्टर या केंद्रात व्हिजीट करेल अशी व्यवस्था करण्यात आली. यानंतर समितीने गावकºयांमध्ये जनजागृती सुरू केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना बाबतीत गावकºयांना सुचना देण्यात आल्या. सोशल मिडीया व व्हाटसअ‍ॅप ग्रुप तयार करुन जागरुकता करण्यात आली. या ग्रुपवर कोणत्याही प्रकारचे नकारात्मक मॅसेज टाकण्यास बंदी घातली. गर्दी टाळण्यासाठी गावातील तरुणांच्या कट्यावर जाळले आॅइल टाकुन तेथे बसण्यास मज्जाव करण्यात आला. वेळेप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन काही जणांकडून दंड वसुल केला. गोळा झालेली आठ हजार रुपये दंडाची रक्कम ग्रामपंचायतीने स्वत:कडे न ठेवता त्यातून संबधित पोलिस ठाण्यास सॅनिटायझर मशीन बसवून दिली. गावात दररोज हायफोक्लोराईडची फवारणी सुरू करण्यात आली. त्यामुळे गाव निर्जंतूक होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.तसेच प्रत्येक घरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली़ गावात वेळोवेळी कोरोना तपासणीचे शिबीर घेण्यात आले. यात दिड वर्षात या गावातील केवळ १५ लोकांना कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने यातील केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. इतर कोणत्याही ग्रामीण भागातील कोरोनाच्या आकडेवारीपेक्षा कढोली गावातील आकडे नक्कीच कमी आहेत. यात गावच्या सरपंच प्रांजल वाघ यांच्यासह विशेष समिती व गावकºयांचे मोठे श्रेय आहे. या लोकांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वत: योद्धा होऊन कोरोनाशी दोन हात केले व पुढेही प्रयत्न सुरू आहे़
कढोलीच्या सरपंच प्रांजल वाघ व पदाधिकारी यांच्या कामाची पावती म्हणजे कढोली गावात प्रवेशद्वारापासून ते शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभुमी सारे काही स्वच्छ, सुंदर व टापटीप आहे. गावकºयांना स्वयंशिस्त लावण्यात आली आहे व त्याचे पालनही नागरिक करित आहे़ केंद्र शासनाच्या पंचायत सशक्तीकरण स्पर्धेचे आठ लाखांचे बक्षिस ग्रामपंचायतीने जिंकले आहे. या शिवाय राज्य पातळीवरील एकुण ७० लाखांची बक्षिसे ग्रामपंचायतीने पटकावली आहेत. शेजारी गावातील नागरिकही कोरोना बाधीत होत असताना कढोली गावाच्या रोजगार समितीने गावात जाऊन स्वच्छतेसाठी मदतकार्य केले. त्या गावातील कोरोना देखील हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
सुरूवातीला गावातील ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना लस देण्यात आली. यानंतर शासन निर्णयानुसार १८ व ४५ वर्षे वयोगटातील नागरीकांनाही लस देणे सुरू आहे. कढोली गावात आत्तापर्यंत ९० टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. येणाºया काही दिवसात उर्वरीत सर्व जणांना लस दिली जाईल असा निर्धार समितीने केला आहे. कढोली गावातील सुमारे ५०० जण दररोज गावानजीक असलेल्या विविध ३२ कंपन्यांमध्ये कामाला जातात. त्यांचा अनेक कामगारांशी बोलणे, भेटण्याच्या माध्यमातून संबध येतो. असे असतानाही गावात आल्यानंतर या कामगारांना सॅनिटायझेशन, मास्कींग सक्ती असल्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. अशा पद्धतीने देखील कोरोनाला रोखण्यात आले आहे. यात सर्वतोपरी नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले असल्याने गावात कोरोनाची दहशत नाही़