
पद्मश्री डॉ. के के अग्रवाल यांचे कोरोनाने निधन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी संचालक, पद्मश्री डॉ. के के अग्रवाल यांचे सोमवारी रात्री कोरोनाने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. मात्र 17 मे रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. के. के. अग्रवाल हे 62 वर्षांचे होते. त्यांचे निधन हे वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठा तोटा आहे.
महत्त्वाचे म्हणजे डॉ. अग्रवाल यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 28 एप्रिल रोजी त्यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती.
डॉ. के के अग्रवाल हे त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते. प्रत्येकाने करोना कालावधीत त्यांचा चांगुलपणा पाहिला. संकटाच्या वेळी त्यांनी हजारो लोकांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. करोना संकटाच्यावेळी ते नेहमी वॉरियर्स म्हणून उभे राहिले, पण दुर्दैवाने त्याच करोनाबरोबर ते आयुष्याची लढाई हारले. २०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

