वादळामुळे झाड कोसळून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :जळगाव – अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेने सरकत असलेले तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.

ज्योती आणि रोशनी यांचे वडील बल्लू बारेला हे अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावातील रहिवासी राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती. ही घटना घडली तेव्हा बारेला दाम्पत्य हे दररोजप्रमाणे शेतात कामाला गेलेले होते. ज्योती आणि तिची लहान बहीण रोशनी घरी होत्या. त्याचवेळी अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

You missed