‘तौक्ते’चा तडाखा! मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी पडझड
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेने सरकत असलेले तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मुंबईच्या समांतर समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जाणार असून त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्याच्या किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. मुंबई आणि परिसर, ठाणे जिल्ह्यात व नवी मुंबईत रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहेत. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे आणि छप्परही उडाले.
कल्याण, डोंबिवली परिसरात पहाटेपासून पावसाळा सुरुवात झाली आहे. पहाटेपासून पावसाची संततधार सुरुच आहे. पहाटे वारा असल्याने विदयुत विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्याने उकाड्याने हैरान झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेले तौक्ते चक्रीवादळ रायगडच्या किनाऱ्यावर घोंगावत आहे. मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास बाणकोट हरिहरेशवर येथून या वादळाने रायगड हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर सकाळी 5 वाजता अलिबाग समुद्रात पोहोचले. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण 170 ते 200 सागरी मैल अंतरावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर जिल्ह्यातील सुमारे 8 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चक्रीवादळ धोके आणि उपाय योजनांची माहिती देण्यासाठी एसएमएस ब्लास्टर सेवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यान्वित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव पाहता रायगडच्या नागरिकांमध्ये भीती होती, त्यामुळे लोकांनी रात्र जागून काढली. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस सुरु आहे. वाऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील 4 ते 5 गावात घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. पोलादपूर तालुक्यातही घरांचे नुकसान झाले आहे. आता चक्रीवादळाची मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

