
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोनावर मात केल्यानंतर सातव यांच्या शरीरात ‘सायटोमेगॅलो’ हा नवा विषाणू आढळला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी करून घेतली. 22 एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 23 एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. उपचारानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र 25 एप्रिलला त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने 28 तारखेपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली, 10 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. लवकरच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात ‘सायटोमेगॅलो’ हा नवा विषाणू आढळला. त्यानंतर त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर झाली होती. सायटोमेगॅलोने ग्रासल्याने त्यांचे निधन झाले.
दरम्यान, राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात असत. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड करण्यात आली होती. अनेकदा राज्यातील बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत करून 2014 साली हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. हिंगोलीच्या खासदारपदी असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, रेल्वे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये ते सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी ट्विट करून त्यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती, तसेच आपल्या संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

