
राज्यात सर्व ठीकठाक आहे योगी आदित्यनाथ म्हणतात
यूपीमध्ये कुत्रे मृतदेहाचे लचके तोडतात…
कचर्याच्या गाडीतून मृतदेह नेले जातायत : काँग्रेसची सरकारवर टीका
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : अलाहाबाद-कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशात हाहाकार उडवला आहे. देशामध्ये रोज साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सर्वच राज्यांमधील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण पडल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स, रुग्णवाहिका, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य सेवांची कमतरता जाणवत आहे. याच कारणामुळे मरण पावणार्यांची संख्याही वाढली आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र याच दाव्यावरुन काँग्रेसने एका बातमीच्या आधारे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर निशाणा साधालाय.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचर्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे. असे असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचे सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटे बोलत नाहीत असे म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय, असे सुरजेवाला म्हणाले आहेत.
सुरजेवाला यांनी या ट्विटसोबत एका वृत्तपत्रातील बातमीची लिंक पोस्ट केली आहे. या बातमीमध्ये उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो दाखवून राज्यातील कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे यासंदर्भातील भाष्य करण्यात आले आहे.
कचरा गाडीतून नेला मृतदेह
शामली येथील जलालाबादमधील प्रमिला नावाच्या महिलाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. प्रमिला या एकट्याच राहत असल्याने त्यांचा मृतदेह स्मशानभूमीवर पोहचवण्यासाठी कोणीच नव्हते. आजूबाजूच्यांनाही प्रमिला यांच्या मृतदेहावर अंत्यस्कार करण्यासासंदर्भातील तयारी दाखवली नाही. शेजारच्या एका डॉक्टरांनी महानगरपालिकेला यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर कचरा नेणारी गाडी पाठवून प्रमिला यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या फोटोमुळे प्रशासनाबरोबरच एकूण व्यवस्थेवरच टीका केली जात आहे. या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींना शिक्षा देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
हातगाडीवर मृतदेह नेण्याची वेळ
योगी आदित्यनाथ ज्या गोरखपूरचे आहेत तेथील बडहलगंजमध्ये मंगळवारी १00 वर्षीय भागवत गुप्ता यांचे निधन झाले. त्यानंतर एका हातगाडीवर त्यांचा मृतदेह स्मशानभूमीवर घेऊन जाण्यात आला. गुप्ता हे त्यांच्या मुलीसोबत राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना खोकला आणि ताप आला. डॉक्टरांनी त्यांना औषधे दिली मात्र त्याचा फायदा झाला नाही. मंगळवारी गुप्ता यांचे निधन झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी त्यांच्या जावयाने अनेक ठिकाणी फोन केले मात्र रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे गुप्ता यांचा मृतदेह हातगाडीवरुन स्मशानात घेऊन गेले. तेथे दोन अनोळखी लोकांच्या मदतीने त्यांनी सासर्यांवर अंत्यस्कार केले.

