
भारतात कोरोना रुग्णवाढीला धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम जबाबदार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असून काही धार्मिक तसंच राजकीय कार्यक्रम जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला असून देशात वेगाने होणाऱ्या कोरोना रुग्णवाढीच्या कारणांची मीमांसा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘नुकतंच भारतातील स्थितीसंबंधी करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक गोष्टी कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी कारणीभूत असल्याचं दिसत आहे. यामध्य कोरोनाचे वेगवेगळे उपप्रकारदेखील कोरोनाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेले अनेक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमही जबाबदार आहेत. यावेळी कोरोनासंबंधित नियमांचं कोणतंही पालन न करणं एक कारण होतं. दरम्यान भारतात कोरोनाचा प्रसार होण्यामागे यापैकी कोणती गोष्टी किती जबाबदार ठरली हे व्यवस्थित समजू शकलेलं नाही.’
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून साप्ताहिक माहिती प्रसिद्द करण्यात आली असून यावेळी भारतात ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाच्या बी.१.६१७ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळला होता अशी माहिती दिली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात होणारी रुग्णवाढ आणि मृत्यू यामुळे बी.१.६१७ तसंच इतर उपप्रकाराच्या भूमिकेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

