

कोरोनावरील उपचारांसाठी Steroids चा वापर रुग्णाच्या जीवाला घातक- डॉ.रणदीप गुलेरिया
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, (वृत्तसंस्था) नवी दिल्ली – दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्यानं देशभरातील रुग्णालयांमध्ये बिकट स्थिती पाहायला मिळत आहे. रुग्णांची जीव वाचवण्यासाठी त्याचे नातेवाईक जीवाचं रान करत आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात Steroids चा वापर केला जात आहे. मात्र, कोरोनावरील उपचारासाठी Steroids चा वापरामुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
लक्षणं कमी असलेल्या रुग्णांना Steroids चा हाय डोस दिल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. अशावेळी रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकते. Steroids चा हाय डोस दिलेल्या रुग्णाला गंभीर व्हायरल न्युमोनिया होऊ शकतो आणि त्यांच्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात व्हायरस पसरु शकतो, असं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलंय.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, Steroidsचा वापर फक्त मॉडरेड रुग्णांच्या उपचारांसाठीच केला जावा. Steroidsच्या वापराबाबत त्यांनी नागरिकांना महत्वाची सूचना देताना सांगितलं की साधारण लक्षणं असलेल्या रुग्णांना सुरुवातीच्या 5 दिवसांत Steroids दिले जाऊ नये. असं केल्यास कोरोना संक्रमित रुग्णासाठी त्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये Steroidsचा वापर शरिरात असलेल्या व्हायरस अधिक प्रमाणात पसरण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘सौम्य लक्षणं असतील तर CT Scan करु नका’
कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर तातडीने कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेता येऊ शकतात. पण तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर CT Scan करु नका असं आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून करण्यात आलं आहे. डॉ. गुलेरिया यांनी त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सीटी स्कॅन हे छातीच्या तीनशे एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे. तसेच कॅन्सरचा धोकाही संभवू शकतो, असा इशाराही गुलेरिया यांनी दिला आहे.

