
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार?
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, (वृत्तसंस्था) कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झाले आहे.
ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पाहावे लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिदीर्तील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम मतदारसंघाकडे आहे. सकाळी 9.30 पर्यतनंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाचे सुवेंद्रू अधिकारी यांचं आव्हान असून सध्या ते आघाडीवर आहेत. ममता बॅनर्जी जवळपास १५०० मतांनी पिछाडीवर आहेत.

