
नागपुरात कोरोनाने माजवला हाहाकार, सरकार हतबल आणि जनता लाचार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- राज्य सरकार दररोज जी आकडेवारी जाहीर करत ती पाहिल्यास नागपूर विभागात रुग्णसंख्या वाढल्याचं समोर येतं.नागपूरच्या तुलनेत मुंबई-पुणे वगळता इतर भागातील रुग्णसंख्या कमी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मग नागपूरमध्ये अशी परिस्थिती कशी काय निर्माण झाली, असा प्रश्न विचारला जातोय. नागपूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 28 एप्रिल 2021 रोजी 7 हजार 503 एवढे कोरोना रुग्ण आढळले. यात महापालिका क्षेत्रातील 4 हजार 803, तर ग्रामीण मधील 2 हजार 690 एवढे रुग्ण आहेत.संपूर्ण नागपूर जिल्ह्यात एकाच दिवशी 26 हजार 525 एवढ्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या.कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढले असून 6 हजार 935 म्हणजेच 78.60% रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाची स्थिती कशी बिघडली?
“गेल्या वर्षी आपण कोरोनाच्या प्रकोपावर लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग आणि मास्क याद्वारे चांगले नियंत्रण मिळवले होते. पण नंतर अनलॉकमुळे लोक सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टंसिंगची त्रिसूत्री विसरले आणि कोरोनाची दुसरी लाट आली,” असं नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे सांगतात. शासकीय रुग्णालय असल्याने शहर आणि ग्रामीण दोन्ही भागातून रुग्णांचा ओघ आमच्या रुग्णालयात सुरु आहे. या परिस्थितीत आम्ही रुग्णांना आम्ही सेवा देतोय, असंही डॉ. गावंडे यांनी सांगितलं.
टेस्टचा रिझल्ट यायला वेळ लागतोय म्हणून ते सिटीस्कॅन काढतात. हे सर्व झाले की मग हॉस्पिटल्स मिळविण्यासाठी खटाटोप करतात. पण या सर्वांमध्ये ज्यांना हॉस्पिटल्सची गरज नाही, ज्यांच्यावर घरीच विलगीकरणात राहून उपचार करण्यात येऊ शकतात तेही आपली सर्व ताकद लावून हॉस्पिटल बेड मिळवतात. यात ज्या रुग्णांची स्थिती गंभीर आहे त्यांना हॉस्पिटल मिळत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो.”
आरोग्य यंत्रणेची तयारी कशी आहे?
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, “27 एप्रिल 2021 रोजी पर्यंत नागपूर महानगर पालिका क्षेत्रात साडे पाच हजारावर अतिरिक्त बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या 7 हजार 144 इतकी झाली आहे.”
“सप्टेंबर 2020 नंतर 5 हजार 630 बेड्स वाढवण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात 4 हजार 653 बेड्स आॅक्सिजनसह असून 2 हजार 113 बेड्स आय.सी.यू.चे आहे, तर 542 बेड्स व्हेंटिलेटर्सचे आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”
याशिवाय निवासी हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि रेल्वे कोचमध्ये कोव्हिड केअर सेंटर उभारले जात आहे.
पत्रकार विकास वैद्य सांगतात, “या संकटकाळात अनेक संस्थांनी आणि आस्थापनांनी पुढाकार घेऊन तात्पुरती हॉस्पिटल उभारली आहेत. पण 150 बेडच्या हॉस्पिटल्स मध्ये चारच डॉक्टर उपलब्ध असतात. नर्स, वॉर्डबॉय हे सुद्धा कमी आणि अप्रशिक्षित. यामुळे हे होतयं की कुठल्याही पेशंटला वाटेल तसे रेमडेसिवीर किंवा नातेवाईक मागणी करतील ते ओषध दिल्या जातं. मग यातूनच ब्लॅक मार्केटिंग वाढीस लागली.”
महापालिकेची तयारी कशी आहे?
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी सांगतात, “सध्या नागपुरात कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन बेड्सची संख्या वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. बेड्सची उपलब्धता असली तरी आॅक्सिजनची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बेड्सचा उपयोग नाही, त्यामुळे आॅक्सिजनची व्यवस्था करण्यावर आम्ही भर देत आहोत. यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
“विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा आॅक्सिजन टँकर उपलब्ध केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकायार्ने व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात येत आहे. संपूर्ण प्रशासन कामाला लागले असून उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. नागरिकांनीही यात संयमाची भूमिका ठेवून सहकार्य करावे.”

