
नांगग्ला : प्रशांत महासागरातील क्षतिग्रस्त पाणडुबी
– कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)
बुधवार,२१ एप्रिल,२०२१ला सकाळी तीन वाजता इंडोनेशियन पाणडुबी नांगग्ला ४०२चा समुद्री युद्धाभ्यासाच्या मुख्यालयाशी असलेला रेडियो संपर्क तुटला आणि त्या नंतर ती पाणडुबी,प्रशांत महासागराचा हिस्सा असलेल्या बाली समुद्राच्या काळ्याभोर पाण्यात जणू काय अदृश्य झाली. इंडोनेशियन पाणडुबी ताफ्याचा कमांडर,कमोडोर हॅरी सेतीयावन समेत ५३ नौसैनिक असलेल्या,१३९५ टनाच्या या पाणडुबीनी टारपेडो फायरिंग प्रशिक्षणासाठी समुद्रात जलद सुरकांडी मारली त्या ठिकाणी पाण्यावर एक मोठा तैल तवंग (ऑइल स्लीक) आणि थोड पुढे,समुद्राच्या ३०० फूट खोल पाण्यात, मोठी चुंबकीय शक्ती (हाय मॅग्नटिक फोर्स) असलेला एक हिस्सा (पार्ट), याच दोन गोष्टी शोधदलाला पहिल्यांदा दिसल्या/सापडल्या.समुद्रस्तरावरील तैल तवंगामुळे,पाण्याच्या अती प्रचंड दबावानी पाणडुबीची बॉडी क्रॅक होऊन फ्युएल टँक फाटला असेल हा निष्कर्ष निघतो.सामान्यतः पाणडुबीची बॉडी,पाण्याचा फार मोठा दबाव झेलू/सहन करू शकते.ती तुटण्याची/त्याला तडा पडण्याची संभावना कमी असली तरी,पाण्याच्या दबावातील आकस्मिक व प्रचंड बदलामुळे (सडन चेंज इन वॉटर प्रेशर) अस होऊ शकत.
१९६ फूट लांब आणि १९ फूट रुंद,३४ नौसैनिक नेण्याची क्षमता असलेल्या नांगग्ला ४०२ पाणडुबीची निर्मिती १९७७मधे जर्मनीत झाली.तीची संपूर्ण युद्धक्षम मशागत (फुल वॉर मेंटेनन्स) मे,२०१८ मधे जर्मनीतच झाली होती.टारपेडो फायरिंगसाठी जातांना ३४ नौ सैनिकांसाठी बनलेल्या या पाणडुबीत ५३ लोक का गेले/नेण्यात आले हे चौकशी अंतीच उघड होईल.बाली बेटाच्या उत्तरेस युद्धाभ्यासाचा सराव करतांना या पाणडुबीनी टॉरपेडो फायरिंगसाठी खोल समुद्रात जाण्याची (डीप सी डायव्हिंग) परवानगी मागितली.ज्या ठिकाणी ही पाणडुबी खोल गेली त्या क्षेत्रातील समुद्रतळावर ६०० ते ७०० मीटर्स खोल दऱ्या (डीप क्रिव्हासेस) आहेत.नांगग्ला ४०२ पाणडुबीनी एक सरावी (प्रॅक्टिस) आणि एक खरा (लाईव्ह) ते दोन टारपेडो फायर केलेत अशी सूत्रांची माहिती आहे.मात्र या टारपेडो फायरची रेडियो सूचना (कन्फर्मेशन) न मिळल्यामुळे, मुख्यालयात चिंतेच वातावरण निर्माण झाल.सोनार इक्विपमेंट असलेल्या दोन इंडोनेशियन लढाऊ जहाजांना या पाणडुबीचा शोध घेण्यासाठी तात्काळ रवाना करण्यात आल.सिंगापूर,मलेशिया आणि भारतीय नौदलांनी नांगग्ला ४०२चा शोध घेण्यासाठी आपले युद्धपोत पाठवले.२० इंडोनेशियन जहाजां बरोबरच या देशांची सहा जहाज,तीन हेलिकॉप्टर आणि ४०० नौसैनिक या कामी गुंतले आहेत.अमेरिका, ऑस्ट्रेलिया,फ्रांस आणि जर्मनीनी त्यांच्या सागरी शोध पथकांची मदत पाठवण्याची हमी दिल्यावर, शुक्रवार,२३ मेला अमेरिकेनी त्यांच पी ८पोसायडॉन नेव्हल रिकॉनिसन्स विमान या शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी पाठवल.हे विमान खास करून समुद्रातील पाणडुब्यांचा शोध घेण्यासाठी उपयोगी असत. शनिवार/रविवारच्या रात्री पाणडुबीचा प्राणवायू साठा संपुष्टात येणार होता.
प्रत्येक जहाज/पाणडुबीला कालातीत तपासणीला (पिरियॉडिक चेकअप्स) सामोर जाव लागत.प्रत्येक जहाज/पाणडुबीवर अतिशय कर्तबगार आणि कर्तव्यशील तंत्रज्ञ असतात. प्रत्येक स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजरच (एसओपी) शब्दश: पालन केल्या जात. तरीही मानवी चुका आणि/ किंवा तांत्रिक/ मशिनरी दोषामुळे अपघात होतच असतात.अशा दुर्घटनेच्या संभावना फार कमी असल्या तरी दुर्घटना टाळता येत नाही.०८ मार्च,१९६८ला रशियन मिसाईल सबमरीन के १९ ही ९८ नाविकांसमेत प्रशांत महासागरात क्षतिग्रस्त झाली; २२ मे १९६८ला अमेरिकेची स्कॉर्पियन पाणडुबी ९९ नाविकांसमेत अटलांटिक महासागरात गायब झाली; ०४ मे,१९७०ला फ्रेंच सबमरीन युरिडीस मेडिटरेनियन सागरात ६७ नाविकांना घेऊन अदृश्य झाली; ०७ एप्रिल,१९८९ला के २७४ ही रशियन पाणडुबी ४२ नाविकांसमेत नॉर्वेजियन समुद्रात भस्मसात झाली; २००३ मधील युद्धाभ्यासात,चीनी पाणडुबी ३६१ दक्षिण चीन समुद्रात ७० नविकांसमेत ध्वस्त झाली. २०००मधे रशियन पाणडुबीतील स्फोटात ११८ नौसैनिक ठार झालेत आणि वाचलेल्या २३ जणांना पाणडुबीतील प्राणवायू संपल्यामुळे तडफडत प्राणत्याग करावा लागला.३९ दिवसांनी त्या पाणडुबीचा शोध लागला.२००५मधे एक छोटी रशियन पाणडुबी खोल समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली होती. पण त्यांचा प्राणवायू संपण्याच्या केवळ तीन तास आधी त्यांची सुटका करण्यात आली. २०१७मधे अर्जेंटिनाची पाणडुबी विद्युत प्रणालीतील खराबीमुळे क्षतिग्रस्त होऊन त्यातील ४४ नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांचे अवशेष एक वर्षानंतर मिळाले.
समुद्रातील शोध मोहीम (सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स) वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ जहाज आणि विमानांच्या समन्वयानी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्षेत्र धुंडाळून केल्यामुळे प्रभावी होत.समुद्रस्तरावर दिसणारे तैल तवंग,पाणडुबीचे अवशेष,गॅदर्ड सोनार व्हॅल्यूज यांच्यामुळे हरवलेल्या पाणडुबीचा शोध घेण्यास मदत मिळते. या वेळी नांगग्ला ४०२ पाणडुबीमधील प्राणवायू कमतरतेच्या जटिल समस्येमुळे वेळेच महत्व शतपटींनी वाढल होत. जहाजांवरील सोनार इक्विपमेंटस; समुद्रतळावरील लक्ष्य (अंडर वॉटर प्रोफाइल ऑफ ऑब्जेक्ट) दिसत का,मशिनरीचा आवाज (मशीन अकॉस्टिक) ऐकू येतो का आणि इमर्जन्सी सिग्नल मिळतो/सापडतो/दिसतो का याचा शोध घेतात.नौसेना तज्ञांनुसार नांगग्ला ४०२च्या अपघाताची अनेक कारण असू शकतात.
अ) ही इंडोनेशियन पाणडुबी जलद गतीनी खोल समुद्रात गेल्यामुळे त्याच्यावर अचानक पाण्याचा प्रचंड दबाव येऊन क्षतीग्रस्त झाली असेल; ब) त्वरेने ६००-७०० मीटर खोलात उतरल्यामुळे (स्पीडी डाइव्ह) त्याची विद्युत चलन शक्ती (इलेक्ट्रिक पावर) क्रमवार अतिक्षीण होऊन पाणडुबीत संपूर्ण अंध:कार (ब्लॅक आऊट) झाला असेल. परिणामस्वरूप,आतील लोकांना मानसिक धक्का/धसका बसून (पॅनिक रिऍक्शन) त्यांची विचारशक्ती संपली असेल.ब्लॅक आऊटमुळे वीज पुरवठा खंडित होतो आणि पाणडुबीतील सर्वच भागांची तांत्रिक हालचाल (मेकॅनिकल मुव्हमेंट्स) आपोआप बंद पडून कुठल्याही प्रकारची यांत्रिक हरकत होण/करण केवळ अशक्य असत; क) नांगग्ला ४०२ सारख्या डिझेल इलेक्ट्रिक पावर्ड सबमरिन्स, ५०० मीटर पर्यंत खोलवर (डेप्थ) जाऊ शकतात.त्या पलीकडे खोल जाण अतिशय धोकादायक (फेटल) असत. नांगग्ला ४०२ पाणडुबी ६०० मीटरच्याही खाली गेल्यामुळे ती क्षतीग्रस्त होण स्वाभाविकच होत. ड) पाणडुबीला क्रॅकच पडली असणार कारण स्फोट झाला असता तर त्याचा आवाजी लहरी (अकॉस्टिक) या क्षेत्रातील जहाजांच्या सोनार इक्विपमेंटवर रेकॉर्ड झाल्या असत्या; इ) दुर्घटना झाली त्या ठिकाणी बाली समुद्र १५०० मीटर पेक्षा जास्त खोल असल्यामुळे तेथून नांगग्ला ४०२ ला किंवा त्याच्या अवशेषांना बाहेर काढण जवळपास अशक्यप्राय असेल/असणार आहे.
सरतेशेवटी नांगग्ला ४०२ पाणडुबीचा प्राणवायू साठा संपुष्टात आल्यामुळे इंडोनेशियन मिलिटरी चीफ मार्शल,हादी तजःजांतो यांनी रविवार,२५ एप्रिलला सकाळी,”इंडोनेशियन पाणडुबी समुद्रात डुबली असून कोणी वाचण्याची शक्यता नाही” हे अधिकृत रित्या जाहीर केल.शोध मोहिमेत,वर उल्लेखित गोष्टीं बरोबर पाणडुबीच्या आतील; टारपेडो ट्युब स्ट्रेटनर्स, कुलिंग पाईप रॅप्स,पेरिस्कोप वंगणाच्या कॅन्स, स्पॉन्जेस,सबमिन सोलरचे अवशेष आणि प्रेयर रग्ज मिळाल्यामुळे मिलिटरी मार्शलनी ही घोषणा केली.अस असल तरी देखील या पाणडुबीच्या शोधाची बहुराष्ट्रीय मोहीम सुरूच राहील.अमेरिकेच्या पी ८ पोसायडॉन नेव्हल रिकॉनिसन्स विमानानी घेतलेल्या स्कॅनवरून पाणडुबी ८५० मीटर्स (२८००फूट) पेक्षाही जास्त खोल समुद्र तळाशी विसावली आहे हे कळत. या प्रकारची पाणडुबी आरामात २५०-३५० मीटर खोल जाऊ शकते. मात्र ह्यात ५०० मीटर खोल पाण्याचा दबाव सहन करण्याचीच (विथ स्टॅन्ड ए डेप्थ) क्षमता आहे.३५० मीटर नंतर पाण्याचा दबाव सहन करण्याची हीची क्षमता क्रमवार कमी होत (ग्रॅज्युअल डिटेरिओरेशन) जाते.पण ८०-१०० मीटरवर असलेली पाणडुबी, एकदम जलद सुरकांडी मारून ५०० किंवा त्या पेक्षाही जास्त खोल गेल्यास बॉडी क्रॅक होण्याची दाट शक्यता असते आणि नांगग्ला ४०२च्या बाबतीत हेच झाल असणार.पाणडुबी २५०-३००-४००-५०० मीटर खोल जात असतांना केंव्हातरी,कुठेतरी क्रॅक निर्माण झाली असेल आणि जेंव्हा नांगग्ला ४०२ त्याही पेक्षा खोल जाऊ लागली/गेली त्यावेळी ती क्रॅक मोठी होत जाऊन शेवटी बर्स्ट झाली असेल.पाण्याच्या एवढ्या दबावा खाली पाणडुबीचा स्टील शेल,फोल्डिंग अकॉर्डियन सारखा फोल्ड झाला असेल.पडलेल्या/बर्स्ट झालेल्या क्रॅकमधून प्रचंड प्रमाणात पाणी आत शिरल्यामुळे पाणडुबीची “बॉयन्सी काउंटर ऍक्ट” क्षमता निष्प्रभ होऊन तीला जल समाधी घ्यावी लागली. नांगग्ला ४०२ पाणडुबी आपल्या क्रश डेप्थच्याही (५०० मीटर) खाली,८५० मीटर पर्यंत गेल्यामुळे त्यातील नाविक जिवंत असण्याची शक्यता अजिबात नव्हती.म्हणूनच आता तीची शोध मर्यादा, पाणडुबी आणि/किंवा नाविकांचे अवशेष शोधून ते वर आणण्या पर्यंतच ठेवण्यात आली आहे.
अमेरिका/भारताकडे असलेल्या,२४ नाविक असणाऱ्या डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल मधील (डीएसआरव्ही) डीप वॉटर रेस्क्यू युनिट, पाणडुबीच्या झाकणाला (हॅच ऑफ सबमरीन) शोधून ते उघडते/ फोडते आणि फसलेल्या नाविकांना बाहेर काढते. मात्र नांगग्ला ४०२ पाणडुबी ८००-८५० मीटर खोल असल्यामुळे या वेळी ते शक्य नव्हत.डीएसआरव्हीला त्याच्या मदर शिपवरून अपघाताच्या जागी नेल्यानंतर रेस्क्यू टीम त्यांच कार्य करते.आशियात फक्त भारताकडे ही खास प्रणाली असल्यामुळे आपण हे व्हेईकल लगेच इंडोनेशियात पाठवल पण त्या आधीच अमेरिकेच्या पी ८ पोसायडॉन विमानीं या पाणडुबीच्या अवशेषांची व्हिडियो रेकॉर्डिंग केली आहे. रेस्क्यू टीम्सनी ३४ स्क्वेयर किलोमीटरचा समुद्र पिंजून काढल्या नंतर नांगग्ला ४०२चा थांगपत्ता मिळाला. पाणडुबीचा पुढचा (हल पोर्शन),मधला (मेन पोर्शन) आणि मागचा (स्टर्न पोर्शन) वेगळे झाले आहेत. मध्यभागात क्रॅक्स दिसतात. पाणडुबीच्या मागच्या भागावरील फिन्स व्हिडियोत स्पष्ट दिसतात. पाणडुबीनी सुरकांडी मारली त्याच्या चार पाच किलोमीटरमधेच तीचे अवशेष सापडल्यामुळे जो काही हादसा झाला तो डायव्हिंग दरम्यानच झाला असावा असा निष्कर्ष निघतो. आता हे ह्युमन फेल्युअर होत की मटेरियल/मेकॅनिकल फेल्युअर,पाणडुबीत आग लागली होती की नाही,या बद्दल खरी माहिती मिळण कठीण आहे. पाणडुबीत,विमानासारखा ब्लॅक बॉक्स नसल्यामुळे तेथील घटनांची सूत्रबद्ध साखळी शोधता येत नाही. क्रॅक्समधून पाणी आत शिरल्यास तीच्या बॉयन्सीवर परिणाम होऊन तीची खोल ओळख क्षमता (डेप्थ कंट्रोल केपेबिलिटी) नष्ट होते. १३९५ टनांच्या नांगग्ला ४०२ पाणडुबीच्या अवशेषांना वर आणण अतिशय खर्चिक असल्यामुळे अपघाताच कारण;त्या ठिकाणाच्या (रेक साईट) व्हिडियोच “डिटेल्ड मॅपिंग”,सिलेक्टीव्ह रिकव्हरी ऑफ कंपोनंन्टस तसच समुद्रतळावर पसरलेल्या आणि पाण्यावर तरंगताना मिळालेल्या वस्तूंच पृथ:करण करूनच शोधाव/निश्चित कराव लागेल.
भारताकडे,आयएनएस शिशुमार,शांकुश,शक्ती आणि शंकुल या,चार एचडीडब्ल्यू २०९ पाणडुब्या आहेत. मात्र आपल्याकडे त्यांच,२०९/१५०० हे सुधारित रूप आहे.या सुधारित आवृत्तीमधे,पाणडुबीवरील कुठल्याही आणीबाणीत, ५० नाविकांना त्या पासून दूर नेण्याची क्षमता असलेल “डिटॅचेबल रेस्क्यू पॅड” दिलेल आहे.जर इंडोनेशियाच्या नांगग्ला ४०२ पाणडुबीवर ही प्रणाली उपलब्ध असती तर अनेक नाविकांचे प्राण वाचू शकले असते.अशा प्रकारची पहिली पाणडुबी,आयएनएस शिशूमार, भारतात १९८५मधे आली.पहिल्या दोन पाणडुब्या पूर्णतः जर्मनीतच बनल्या होत्या. उर्वरित दोन,१९८६ ते ९४ दरम्यान मुंबईच्या माझगाव डॉकमधे एकत्र करण्यात/बांधण्यात (असेंबल्ड) आल्या. खर तर भारतानी २०९/१५०० प्रणालीच्या सहा पाणडुब्याची ऑर्डर जर्मनीला दिली होती. शेवटच्या दोन पाणडुब्या भारतात “तंत्रज्ञान हस्तांतर:ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी” अंतर्गत बनणार होत्या.फेब्रुवारी, १९७९मधे मोरारजी देसाई सरकारनी भारतीय नौसेनेला;“सबमरीन टू सबमरीन किलर: एसएसके” प्रणालीच्या,३५० मीटर खोल जाऊ शकणाऱ्या पाणडुब्या खरेदी करण्याची परवानगी दिली.नेव्हल एक्सपर्ट कमिटीनी चार विदेशी संस्थांच्या निविदांची शिफारस केली.
पण जस भारतात नेहमी होत तसच,शेवटच्या क्षणी कमिटीने शिफारस केलेल्या त्या चार संस्थांमधे मधे पहिल्यापासून नसलेल्या,जर्मनीच्या एचडीडब्ल्यू या पाचव्याच कंपनीला,पाणडुब्या बनवण्याचा ठेका देण्यात आला.त्यासाठी नौदलाच्या आक्षेपांना नजरअंदाज करून,३५० मीटरची डायव्हिंग डेप्थ २५० मीटर करण्यात आली.चार पाणडुब्या भारतीय नौसेनेत दाखल होत असतांना,१९८७मधे व्ही पी सिंग संरक्षण मंत्री होते. कशी कोण जाणे,पण त्यांना, एचडीडब्ल्यू कंपनीनी या पाणडुब्याची किंमत खूप जास्त लावली (ओव्हर चार्ज) आहे अशी शंका आली आणि त्यांनी उर्वरित दोन पाणडुब्याच्या प्राईस रिनिगोसिएशनचे आदेश दिलेत.२४ फेब्रुवारी,१९८८ला जर्मनीतील भारतीय राजदूत श्री जे इ अजमानी यांनी; ”जर्मन्स आर नॉट इनक्लाईंड टू रिड्यूस द प्राईस बिकॉज इन्क्ल्युडेड इन इट वॉज सेवान पर्सेंट कमिशन दे हॅड पेड टू सिक्युअर द कॉन्ट्रॅक्ट”; अशा अर्थाची सिक्रेट नोट, पंतप्रधान व्ही पी सिंग यांना पाठवली आणि संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचाराचा दुसरा स्फोट झाला.भारताने उरलेल्या दोन पाणडुब्यांच्या भारतातील निर्मितीला नकार दिला आणि त्यावेळी निर्माण झालेली,पाणडुबी निर्मितीतील भारतीय पिछेहाट २०१२पर्यंत कायम राहिली.स्वतःची प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी लष्करी देशहिताचा बळी देण्यात आला.हि परंपरा २०१४पर्यंत सुरु/शाबूत होती. जर्मन पाणडुबी खरेदी कराराचे उगम कर्ते मोरारजी देसाई होते,इंदिरा गांधींच्या नेतृत्वात त्यावर हस्ताक्षर झाले, राजीव गांधींच्या काळात या चार पाणडुब्या भारतात येन सुरु झालं आणि व्ही पी सिंगने त्याला,पुढची २७ वर्ष जामच राहिलेले ब्रेक लावलेत.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीला अनुसरून,भारतापाशी आलेल्या चार एचडीडब्ल्यू २०९/१५०० प्रणालीच्या पाणडुब्यांमधील नाविकांचा प्रशिक्षण स्तर आणि त्यांच्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सच पुनरावलोकन करण आवश्यक असेल.त्याच प्रमाणे समुद्रात खोलवर जाऊन टारपेडो फायरचा सर्व करावा लागेल. कोणत्याही अमिषाला/दबावाला बळी न पडता,फक्त निर्धारित नविक पाणडुबीत नेण्याची काळजी घ्यावी लागेल. ४२ वर्षांपूर्वी ज्या वेळी नांगग्ला ४०२ पाणडुबी इंडोनेशियन नेव्हीत आली त्याच सुमारास या पाणडुब्या भारतीय नौदलात दाखल झाल्या होत्या.यांच ही “रिफीट, झिरो लिफ्टिंग ऑफ की कंपोनंन्टस अँड रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड सिस्टीम्स” झाल असल्यामुळे या पाणडुब्यांची “मेटल फटिग अँड एनी अदर पोटेन्शियल कॉझ ऑफ फेल्युअर एक्झामिनेशन” करणं अत्यावश्यक आहे. पाणडुबीच चलन संचलन अतिशय कठीण (हाय रिस्क),नाविकांचा जीव खाणार (डिमांडिंग) आणि म्हणूनच अत्युच्च दर्जाच टीमवर्क आणि त्यावरील प्रत्येक नाविकाच्या कर्तव्य निष्ठेची कसोटी पाहणार असत.आता आपल्याला याची खात्री करून घेतली पाहिजे. इंडोनेशियाच्या नांगग्ला ४०२ पाणडुबीला झालेल्या अपघातापासून बोध घेऊन त्वरित उचित कारवाई करण हीच काळानी भारताला दिलेली वॉर्निंग/सूचना आहे.
२७/०४/२२१ : १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१० : ९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com.

