
भारतात मागील २४ तासांत एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची नोंद
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,(वृत्तसंस्था) नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: कहर माजवलाय. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. यंदा २१ एप्रिलला देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात आढळलेली ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या होती. धक्कादायक बाब म्हणजे या दिवसानंतर भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर आता दैनंदिन कोरोनाबळींच्या संख्येनेही आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून एकूण कोरोनाबळींच्या संख्येने २ लाखांचा आकडा ओलांडला आहे.
देशात मागील 24 तासांत तब्बल 3,60,960 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,293 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,79,97,267 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 2,01,187 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 2,61,162 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,48,17,371 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 29,78,709 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर २२ एप्रिलला दैनंदिन रुग्णवाढीने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडला. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची संख्याही धडकी भरवणारी आहे.

