
भूकंपाच्या धक्क्यांनी आसाम हादरले
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,(वृत्तसंस्था)दिसपूर : सकाळी साखरझोपेत असणा-या आसामला मोठा धक्का बसला आहे. आसाम आज सकाळी लागोपाठ तीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता तब्बल ६.४ रिश्टर स्केल इतकी शक्तिशाली होती, जी संपूर्ण आसामसह उत्तर बंगाल आणि उत्तर पूर्व भारतातील काही भागांतही जाणवली. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद अद्याप नाही. मात्र नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल हे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असून, त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसामच्या सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटांनी, तर दुसरा लगेचच थोड्या वेळाने जाणवला. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ मिनिटांनी बसलेला धक्का ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून आपापल्या घराबाहेर पडले. भूकंपामुळे अनेक भागात भिंती कोसळल्या आहेत, अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तसेच अनेक इमारतींच्या भींतींना मोठे तडे गेल्याचेही कळते आहे.

