
कोविशिल्डच्या किंमती केल्या कमी, अदर पुनावाला यांची माहिती; नवे दर किती?
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,पुणे : सीरम इन्स्टिट्युटने कोविशील्ड लसीच्या किंमतीत कपात केली आहे. राज्य सरकारसाठी आता ही लस ३०० रुपयांना मिळणार आहे. जुन्या दरानुसार कोविशिल्डची किंमत ४०० रुपये होती. मात्र, अनेक राज्यांत मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याने राज्यावर अतिरिक्त भार पडणार आहे. म्हणून राज्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सीरमने हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.
अदर पुनावाला ट्विटमध्ये म्हणाले की, कोविशील्ड लसीच्या किमती कमी करत आहोत. राज्य सरकारासाठी कोविशील्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरुन 300 रुपये करत आहोत. लसीच्या कमी केलेल्या किमती तात्काळ लागू होतील. कोविशील्डच्या लसीची किंमत कमी केल्यानं देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असं पुनावाला म्हणाले.
सीरमच्या कोविशील्ड लसीचे जुने दर
सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड लशीची किंमत निश्चित केली होती. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली होती.
भारतात सध्या दोन लस मान्यताप्राप्त
सीरम इन्स्टिट्यूट निर्मित आॅक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन यांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1 मेपासून लस देण्याची घोषणा केली होती आणि असेही म्हटले होते की, लसीकरणाच्या तिस-या टप्प्यातील भाग लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेमधून (सीडीएल) 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला द्यावा आणि उर्वरित 50 टक्के पुरवठा राज्य सरकारांना व खुल्या बाजारात विकण्यास त्यांना परवानगी असेल.

