न्यायालयाने झापल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8546*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

235

न्यायालयाने झापल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नवी दिल्ली- देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे. अशात मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात, अशा शब्दांत चांगलेच फटकारले. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि त्यानंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. येत्या 2 मे रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र आता निकालानंतर राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.

कोरोनामुळे राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच आपल्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. मात्र तब्बल महिनाभर विशेषत: पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभांसाठी मोठी गर्दी होताना दिसली होती. त्यामुळे देशभरात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला होता. यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर अखेर मद्रास उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले.

येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान कोरोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली. यावेळी ‘देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे’, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला. तसेच ‘2 मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी योग्य धोरण आखले नाही तर आम्ही तात्काळ मतमोजणी थांबवू’, असा इशाराही न्यायालयाने आयोगाला दिला आहे. यामुळे राजकीय पक्षांनी विजयी झाल्यानंतर कोणतीही मिरवणूक काढू नये, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच मतमोजणी केंद्रांवर उमेदवारासोबत केवळ दोन व्यक्तींनाच हजर राहण्याची मुभा असेल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.