Home Breaking News मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8530*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

120 views
0

मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई – वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी समन्स पाठवले असून त्यांना बुधवार, 28 एप्रिल रोजी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत असून फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या अहवालात दहशतवादासारखी कृती पकडण्यासाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे आणि त्यासाठीच रश्मी शुक्ला यांनी परवानगी मागितली, जी त्यांना देण्यात आली. परंतु भारतीय टेलीग्राफ कायद्यातील तरतुदींना डावलत रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर केला असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या अहवालानंतर राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना काही व्यक्तींच्या नावे फोन टॅपिंगची परवानगी घेऊन भलत्याच व्यक्तींचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केले होते व या फोन टॅपिंगचा अहवाल लीक केला गेला असा खळबळजनक आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या लीक अहवालाचा आधार घेत पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी विनंती काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आव्हाड म्हणाले होते, ‘केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थितीत फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करू शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.’