
अल्पवयीन जोडप्याने लिव्ह इन मध्ये केली मजा
प्रियकराने गर्भवती प्रेयसीला नाकारून दिली सजा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : चार महिन्यांपासून १७ वर्षीय मुलीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणा-या १७ वर्षीय मुलाने लग्नास नकार दिल्याने २ महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पण, आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जरीपटका हद्दीत कस्तुरबानगर येथे राहणा-या १७ वर्षीय मुलीची तिच्या बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या १७ वर्षीय मित्राशी ओळख झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलगी धुणी भांड्याचे काम करायला जायची. तर मुलगा चायनिज ठेल्यावर काम करायचा. मुलाने अनेकदा तिला एका घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दोघेही प्रेमात बुडाल्याने त्यांनी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. १५ डिसेंबर २0२0 पासून ते मानकापूर येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. दरम्यान, मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे मुलीने मुलाला लग्नाचा तगादा लावणे सुरू केले होते. याबाबत मुलाच्या आईला माहीत होताच तिने मुलगा अल्पवयीन आहे आणि मुलीचे चरित्र चांगले नाही, असे म्हणत दोघांच्या लग्नाला नकार दिला. मुलीच्या घरची आर्थिक स्थितीही नाजूकच आहे. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यामुळे गरोदर मुलीला आई-वडिलांच्या घरी जाणेही अवघड झाले होते. मुलाच्या आईने गरोदर अल्पवयीन मुलीला घरातून हाकलून लावले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने जरीपटका पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.
जरीपटका पोलिसांनी मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याने दोघांच्याही घरच्यांना बोलावून मुलाला ताकीद दिली आणि अल्पवयीन असल्याने त्याला अटक न करता सोडून दिले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

