
माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चंद्रपूर – राज्याचे माजी सांस्कृतिक व पर्यावरणमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय वामनराव देवतळे यांचे रविवारी दुपारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.
संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दादासाहेब देवतळेनंतर काँग्रेसचा चेहरा म्हणून ते समोर आले. २0१४ पयर्ंत तब्बल ४ वेळा त्यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघात त्यांचा दबदबा कायम होता. २0१४ मध्ये मंत्री असताना लोकसभेची निवडणूक लढले. त्यात त्यांचा पराभव झाला. तद्नंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना डावलल्याने ते निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरले. अल्पशा मताने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २0१९ मध्ये भाजप-सेना युतीत वरोर्याची जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे पक्षाच्या आग्रहास्तव संजय देवतळे शिवसेनेकडून लढले होते. यातही काही हजार मतांनी ते पराजित झाले. त्यानंतर शिवसेनेशी ठराविक अंतर ठेवत शेवटी २0२0 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अभ्यासू लोकप्रतिनिधी गमावला : नितीन गडकरी
राज्याचे माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते संजय देवतळे यांना माझी भावपूर्ण र्शद्धांजली. त्यांच्या निधनाने राज्याने एक संवेदनशील आणि अभ्यासू लोकप्रतिधिनी गमावला आहे. ही चंद्रपूर जिल्ह्याची मोठी राजकीय आणि सामाजिक हानी झाली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

