समीक्षा-
प्रेषितांचे बेट : शोषितांच्या अंतस्थ कविता!
प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
मनुष्य हा कलासक्त प्राणी आहे. निर्मिती ही माणसाची मूलभूत प्रेरणा असल्याने तो आपल्यातील कलेला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत असतो.त्यासाठी कोणत्या तरी क्षेत्राची निवड करून आपल्या सुप्त कलेला आकाररहित रूपस देण्याचा मानस बाळगतो. पण एकाच वेळी सामाजिक, वाड्.मयीन, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात नवनिर्मितीचा ध्यास घेऊन अविरत कार्यरत राहणे, हे तर आणखीन कठीण असते. कारण हा प्रवाह तसा शांत व सरळ नसतोच. यात अनेक प्रकारचे खाचखळगे वळणे व भोवरे असतात. त्यामुळे गडप होण्याचीच शक्यता जास्त! तरीही उपक्रमशीलता, प्रयोगात्मकता अशा चळवळ्या धडपडीतून समाजसेवेची झूल पांघरत स्वत:ला सिद्ध करणारे नेमके महाभाग असतात. कारण त्यांची संघर्षशील वृत्ती व कालोचित कृती ध्येय गाठण्यापासपून रोखू शकत नाही, हेच खरे! अशापैकी कवी, लेखक, समीक्षक, पत्रकार, योगशिक्षक, नाट्यकर्मी, मुलाखतकार, दूरदर्शन निवेदक,रसिकराज साहित्य संस्थेचे अध्यक्ष अशा बहुआयामी भूमिकेतील पारंगत व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बळवंत भोयर हे होत.
विदर्भ लेखक संघाद्वारे आयोजित 100 कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात समाविष्ट असलेले कवी बळवंत भोयर यांचा ‘पे्रषितांचे बेट’ हा काव्यसंग्रह अध्यक्ष व संयोजक श्री.वि.गंधे उर्फ मामा गंधे यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी 1997 ला प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण 58 कवितांचा अंतर्भाव असून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. प्रा. वि.स.जोग यांची विवेचक व अभ्यासू प्रस्तावना संग्रहास लाभली आहे. अभ्यासकांस संदर्भमूल्य प्राप्त व्हावे,एवढी मार्गदर्शक आहे. नुकतेच कवी भोयर यांच्या या संग्रहातील ‘भोंगा’ ही कविता नागपूर विद्यापीठाच्या बीएसडब्ल्यू प्रथम वर्ष सत्र-2 च्या भाषावैभव या आवश्यक मराठीच्या अभ्यासक्रमात (सन 2020) समाविष्ट झाली. ही महाराष्टÑातील साहित्यिक जगतासाठी साहित्यानंदाची आगळीक पर्वणीच जणू! या निमित्ताने कवी व कविता यांविषयी थोडी साधक-बाधक चर्चा रसिकांसमोर यावी, हाच हेतू.
‘पे्रषितांचे बेट’ हे काव्यसंग्रहाचे शीर्षक अगदी साधे वाटत असले तरी ते चिंतनीय आहे. प्रेषित म्हणजे देवाचा दूत! दूत म्हणजे ईप्सित स्थळी निरोप पाठविणारा प्रेमळ, प्रामाणिक, परिश्रमी, पारदर्शी गडी, मित्र वा सखा! आणि बेट म्हणजे चोहोकडून पाण्याने वेष्टलेला व मुख्य भूमिपासून तुटलेला प्रदेश होय. याप्रमाणे उत्पादन प्रक्रिया, नवनिर्मिती, तांत्रिक जोडणी, भारवहन अशा क्षेत्रात आपल्या अंगभूत मेहनतीचे देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे महत्वाचे पायाभूत घटक मजूर, शेतकरी, कामगार हे आहेत. या श्रमिक वर्गाचे प्रश्न, समस्या, भविष्यकालीन योजना यावर ठोस उपाय शोधण्याचा व्यवस्थेकडून कधीच प्रयत्न झाला नाही. त्यामुळे सर्वहारा समाज रात्रंदिन काबाडकष्ट उपसूनही मुख्य प्रवाहापासून एखाद्या बेटाप्रमाणे नेहमीच वंचित राहिला आहे. खरे तर, हेच प्रेषितांचे बेट होय.
एस.टी. यंत्रशाळेत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारा हा कवी ह्याच शीर्षकाच्या कवितेतून कामकारांच्या वस्तीशी आपले नाते घट्ट असल्याचे सांगून,
तुझ्यात आणि माझ्यात
प्रेषितांच्या जाणिवेचे आहे
संवेदनशील रक्त
असा ऋणानुबंध जोडतो व हाच ‘माझा गाव’ असल्याची प्रांजळ कबुलीही देतो. ह्याच कवितेचे शीर्षक संग्रहाला दिल्याचे ते सूचक व अर्थसंपृक्त वाटते.
कवी आपल्या काव्यप्रतिमांद्वारे दृश्यात्मक प्रचिती देतो. त्यात मुलाला जगविण्यासाठी राब-राब राबणारी माय, परस्परातील नातेसंबंधात शाश्वताची जाणीव देत प्रीतभावास फुलविणारी प्रेयसी, सृष्टीत नवचैतन्य पेरणारा पाऊस, मानवाचं अख्खं जीवन उन्नत करणारी झाडे, दळण-वळणाद्वारे सेवा पुरविणारे रस्ते या सजीव-निर्जीव घटकाचे योगदान लक्षात घेता हे सुद्धा प्रेषितांचे दूत असल्याची ग्वाही कवी देतो.
कामगार विश्वातील व्यथा, अराजकता, शोषण या ‘अंधारवाटा’ भोगलेल्या कवीने काव्यसंग्रहाच्या अर्पणपत्रिकेतच ‘जगातील तमाम श्रमिकांना’ आसनस्थ करून श्रमसंस्कृतीची भलावण केली आहे. यातून तो ‘तुझे अनादि काळापासून बंदिस्त असणे, हे माझ्या मेंदूला पटत नसल्याची’ खंत सुद्धा जाहीरपणे व्यक्त करतो. कवी हा खुद्द कामगारांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे कामगारवर्गीय दृष्टिकोन हा त्याच्या साहित्याचा केंद्रबिंदू असणे, ही दखलदाद बाब आहे. म्हणूनच कवी हा अतिरंजकता वा आभासी दुनियेत न घुटमळता वंचित घटकांचे आक्रंदण ऐकतो व त्यातील करूणस्वरूपाच्या असहाय हुंदक्यातून ‘कविता म्हणजे’-
भूकेच्या पोटी उसळणारे हाहा:कार
शोषितांच्या जीवनातील अखंड अंध:कार
तसेच
असहाय बलात्काराची विश्वभेदी किंकाळी
त्यास सहाय्य न करू शकणारी चांडाळी
अशी वेदना बेफामपणे प्रकट करते आणि ‘घात करणा-या चेह-या’वरचा पडदा टराटरा फाडून हे सर्व दृष्कृत्य टकटक पाहणा-या चांडाळ चौकडीच्या पौरुषहिनतेलाही धारेवर धरतो.
मानसिक कुचंबना, सार्वत्रिक दंभ, अराजकता, बलात्कार, भ्रष्टाचार, संधीसाधू राजकारण,सनातनी वृत्ती यासारख्या अपप्रवृत्तींची ओळख करून देणा-या ‘अंतस्थ कविता’च्या ‘अंधारगर्भा’तून प्रसवणा-या ‘अंधारसावल्यां’ची भीतिप्रद स्पंदने सुद्धा कवितांमधून ऐकायला मिळतात. काही कवितांत हलकी बोधबाधा दिसून येत असली तरी ‘अश्रू एक संदर्भ,’ ‘कळप’, ‘तुझ्यातला माणूस,’ ,‘भंगलेले देऊळ,’ ‘उपोषणाच्या निमित्ताने,’‘झोपड्या’ यासारख्या वेगवेगळ्या भावविश्वाने भारलेल्या कविता रसिकांना अस्वस्थ व अंतर्मुख करतात.
‘भोंगा’ ही कविता लक्षवेदी व संवेदी आहे. ह्याच कवितेनं कवी बळवंत भोयर यांचा नागपूर विद्यापीठाला पर्यायाने शैक्षणिक वर्तुळाला कवीचा खरा परिचय करून दिला आहे. रूढार्थाने, भोंगा म्हणजे कारखान्यातील कामगारांना वेळ, काळ व कर्तव्यपूर्तीची जाणीव करून देणारी गगनभेदी शीळ! लोह-पोलाद यांसारख्या अवजड वस्तू-निर्मितीच्या कारखान्यात कष्टाळू मजूर, कामगार, तंत्रज्ञ यांचे बेहाल होत असतात. अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते. परंतु त्यांची वेदना, आक्रोश भोंग्याच्या आवाजात केव्हाच विरघळून जाते. त्या मानाने त्यांच्या घामाला व कामाला यथार्ह मोबदला मिळत नाही. तेव्हा अशा उन्मादी भांडवलशाहीची कवीला चीड येते आणि कामगार चळवळीत त्यांच्या हक्कांसाठी व्यवस्थे विरोधात-
चुकवावित पाळीचे भोंगे
अन् बंद पहावीत
कारखान्यातील घड्याळ
असा संताप व्यक्त करून श्रमिकांची बाजू उचलून धरतो. निव्वळ कामे घेण्यासाठी सतर्क करणारे भोंगे व वेळेचे भान देणारी घड्याळे यांचे आदेश झुगारण्याची हिंमत देतो. इतकेच नव्हे, तर कार्ल मार्क्सच्या विचारांनी प्रेरित होऊन कामगारांनी आपापसातील धर्म,जाती या भेदाभेदच्या रूपातील आजवर जोपासलेला ‘ति-हाईत मळ’ पुसून न्याय मिळविण्यासाठी आता कामगारांनी एकत्र येउऊन लढण्याची गरज वर्तवतो. ‘आणि पुसून टाकावा, तुझ्या माझ्यातला ति-हाईत मळ’ या आशयघन ओळीतून कवी समस्त शोषितांची एकजूट करून कामगार वर्गाला, तिच्या चळवळीला आमूलाग्र परिवर्तनाच्या दिशेने जाण्यासाठी सम्यक पार्श्वभूमी तयार करतो. ‘व्यवस्थेचा -हास व परिवर्तनाचा ध्यास’ हाच लेखनसूत्राचा आधार घेऊन कवी वेदनेच्या खोल तळाशी नेत जगण्यातलं मूलभूत सत्य मांडतो.
वंचित बहुजनांच्या उत्थानासाठी अहोरोत्र कष्ट उपसणारे, शोषणाविरुद्ध वैचारिक हल्ला चढवून जाती व्यवस्थेत अंताची लढाई लढणारे, सुधारणासाठी व राष्टÑाच्या बांधणीसाठी सर्वांना एकतेच्या सूत्रात बांधणारे,श्रमिकांवरील अन्यायाला वाचा फोडणारे परिवर्तनवादी शिल्पकार म. फुले, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रायबहादूर नारायण मेधाजी लोखंडे,शास्त्रज्ञ, कलात्मक ही कवीची श्रद्धास्थाने आहेत. मुखपृष्ठाप्रमाणे महासूर्याच्या वैचारिक प्रकाशझोताने कष्टक-यांचे अंध:कारमय बेट निश्चितच उजळून निघेल, अशी कवीला आशा आहे.
यावरून मनस्कता, कल्पकता, स्वाभाविक पे्रेरणा व अंगभूत गंडाचा पिंड असल्याने त्या बेटाच्या अंतर्बाह्य शोध घेण्यात कवी यशस्वी झालेला दिसतो. ह्याच बेटावरून रसिक,अभ्यासकांना सुद्धा अखिल विश्वाचा वेध घेण्याची चैतन्यता लाभो, अशी अपेक्षा बाळगतो व कवीच्या पुढील खडतर साहित्य वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
0 कवितासंग्रह-प्रेषितांचे बेट
0 कवी- बळवंत भोयर
0 प्रकाशक-विदर्भ लेखक संघ,नागपूर
0 एकूण कविता-58
0 मुखपृष्ठ – भाऊ दांदळे
0 एकूण पाने-63
0 मूल्य- 40/-रुपये
—————————————-
५2-ब, साईनगर, गणेश अपार्टमेंटजवळ, दिघोरी नाका, नागपूर-440034 भ्रमणध्वनी-9421803498,
9766278824)

