ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने बीडमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, बीड – राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स, इंजेक्शनचा यांचा तुटवडा जाणवतोय. त्यातच, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथीलस्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, नातेवाईकांचा हा दावा रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे.
आज दुपारीच नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यात बीडमध्ये असा प्रकार घडल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन आणि तीन या वार्डांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या वॉर्डातील ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. ऑक्सिजन बंद झाल्यानेच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही नातेवाईकांनी सांगितलं. अर्धा ते एका तासा दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती यासंदर्भात बोलताना स्वाराती रुग्णालयाच्या प्रशासनं दिली. ज्या रुग्णांचे मृत्यू झाले, त्यांना कोरोनाबरोबर सहव्याधी होत्या आणि रुग्णालयात येतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती असंही म्हटलं आहे.
“मागील तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण त्याच्यासाठी लातूर, औरंगाबाद, जालना, बीड येथून ऑक्सिजन मागवत आहोत. आजही सकाळपासून लातूरहून ऑक्सिजन सिलिंडर मागवले. आयसीयूजवळ मी स्वतः होतो. वॉर्ड नंबर तीनजवळही उभा होतो. या घटनेचा पूर्ण अहवाल मी मागवला आहे. अहवाल आल्यानंतर सगळं स्पष्ट होईल, पण ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू झाल्याचं चूक आहे,” असं सांगत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत

