Home Breaking News ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक वा.रा. गाणार काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक वा.रा. गाणार काळाच्या पडद्याआड

0
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक वा.रा. गाणार काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक वा.रा. गाणार काळाच्या पडद्याआड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक वा.रा. गाणार यांचे मंगळवार, २0 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोरानाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व दोन मुले व मोठा आप्तपरिवार आहे. चार पाच वर्षांपासून ते आंतरभारती आश्रमात डॉ. भाऊसाहेब झिटे यांच्या सहवासात राहत होते. डॉ. भाऊसाहेब झिटे यांच्या जीवनकार्यावर लिहिलेले त्यांचे पुस्तक शेवटचे ठरले.
बालपणापासूनच गांधीजींचा सहवास लाभलेले वा.रा. गाणार हे दिवंगत मा.गो. वैद्य यांच्या संपादकपदाच्या कार्यकाळात दै. तरुण भारत व सामना इत्यादी दैनिकांचे स्तंभलेखक होते. दै. सामनातील लेखांच्या संकलनाचे पुस्तक नाथे प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. दै. भास्करमध्येही त्यांचे लेख आवर्जून प्रकाशित झालेले होते. नागपूर विद्यापीठाने एम.ए. पाली भाषेच्या अभ्यासक्रमात १९७२ ते १९८२ पर्यंत ‘अशोक के अभिलेख’ हे त्यांचे पुस्तक, तसेच महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळाच्या इयत्ता नववीला त्यांच्या पुस्तकातील धडा समाविष्ट केलेला होता. अशोक के अभिलेख, यादें, आदिम जनजाति कोलाम, सफरनामा, विविध लघुशब्दकोश, बहिष्कृत समाजोद्घारक- नानासाहब गवई (हिंदी), बुद्घ बनाम गाँधी, सोव्हिएत संघातील लोककथा, अंदमानची गाथा, दीक्षाभूमीवरून आणि आयुष्याचा प्रवास, बुद्घ एवं मार्क्स आणि महर्षी डॉ. भाऊसाहेब झिटे ही गाणार यांची यांची प्रकाशित ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या ‘महालक्ष्मी नं. ३’या मराठी काव्यसंग्रहाला सर्वोत्कृष्ट म्हणून श्री कमल महालक्ष्मी साहित्य पुरस्कार, ‘अशोक के अभिलेख’ या पुस्तकाला राष्ट्रीय साहित्य अकादमीचा प्रज्ञासूर्य साहित्यिक पुरस्कार, तर सफरनामा या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीचा काकासाहेब कालेलकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. १९७५ मध्ये केंद्रीय हिंदी संचालनालय व समाज कल्याण मंत्रालयानेही त्यांच्या पुस्तकांची विशेष दखल घेतलेली होती. १९५९ मध्ये दिल्ली दूरदर्शनच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. नागपुरात झालेल्या पहिल्या विश्व हिंदी संमेलनात ‘अशोक के अभिलेख’हे पुस्तक अमेरिकेसह दहा देशांमध्ये पोहोचले होते. गेली ५0 वर्षे हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी बांग्लादेश, ब्रह्मदेश, मॉरिशस, अंदमान-निकोबार, अशा देशविदेशातील हिंदी साहित्य संमेलनांमध्ये त्यांना भाषणे आणि काव्यगायनासाठी सन्मानाने आमंत्रित केले गेलेले होते. विदर्भ हिंदी साहित्य संमेलनानेही त्यांना सन्मानित केलेले होते. प्रारंभीच्या काळात ते नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक होते, परंतु गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झाल्यामुळे १९५५ मध्ये त्यांची नोकरी गेली. अन्य गोवा मुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे स्वातंत्र्य संग्राम सैनिक पेन्शन मिळावी म्हणून गोवामुक्ती गौरव समितीच्या पी. के. सावंत, जयंतराव टिळक आणि भगवंतराव गायकवाड यांनीही शिफारस केलेली सर्व अधिकृत कागदपत्रे थेट मंत्रालयापर्यंत हयातभर वारंवार सादर करूनही अखेरपर्यंत त्यांना पेंशन लागू करण्यात आलेली नव्हती.