मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जाहीर करणार लॉकडाऊनबाबतचा निर्णय

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8383*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

230

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जाहीर करणार लॉकडाऊनबाबतचा निर्णय

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू करूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. त्यामुळे लोकांना जरब बसविण्यासाठी कठोर उपाय योजण्याची गरज सर्वच मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केली. आता याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कडक लॉकडाऊन करणार की निर्बंध अधिक कडक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता संपूर्ण कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले. कोणकोणत्या गोष्टींवर कडक निर्बंध लावले जातील यावरदेखील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात अधिकृत घोषणा मुख्यमंत्री बुधवारी करतील, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. याबरोबरच आज (मंगळवारी) जाहीर करण्यात आलेले आदेशही उद्या (बुधवारी) रद्द होतील, असेही परब यांनी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. सध्या रुग्णांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. राज्यात औषधांचा तुटवडा आहे. तसेच आॅक्सिजनचा तुटवडाही मोठ्या प्रमाणावर जाणवतोय. त्यामुळे रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल, तर लोकांना एकमेकांच्या जवळ न येऊ देणे हा त्यावरचा पर्याय असल्याचेही अनिल परब म्हणाले. तसेच राज्यातील जनतेला अत्यावश्यक सेवा नक्कीच मिळत राहतील, त्याबाबत कुठेही अडचण येणार नाही पण त्या कशा मिळतील, याची पद्धत ठरवली जाणार असल्याचेही ते म्हणाले.