नागरिकांनो, काळजी घ्याच! राज्यात २४ तासांत ५०० मृत्यू, ६८ हजारांनी नवे रुग्ण वाढले

169

नागरिकांनो, काळजी घ्याच! राज्यात २४ तासांत ५०० मृत्यू, ६८ हजारांनी नवे रुग्ण वाढले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई – राज्यातील कोरोना (Corona) परिस्थिती अत्यंत भयंकर रुप धारण करतेय. त्यातच, लॉकडाऊनला (Lockdown) नागरिकांचा मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. कारण लॉकडाऊनच्या एक आठवड्यानंतरही राज्यात कोरोनावाढीचा वेग वाढल्याचंच समोर आलं आहे. आज राज्यात तब्बल ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, तर ५०३ मृतांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी अर्थातच चिंताजनक आहे. त्यामुळे परिस्थितीला घाबरून न जाता नागरिकांनी नियमांचं पालन केल्यास ही परिस्थिती नक्कीच सुधारू शकेल.

गेल्या २४ तासांत तब्बल ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ३८ लाख ३९ हजार ३३८ वर पोहोचला आहे. तर, आज ५०३ मृतांची नोंद असल्याने आतापर्यंत ६० हजार ४७३ बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. आज ४५ हजार ६५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढत राहिला लवकरच पूर्णत: लॉकडाऊनचा कडक इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात कोरोना बाधितांना बेड्स मिळत नाहीत. तर, रेमडेसिव्हिर औषधांच्या तुटवड्यामुळे अतिगंभीर रुग्णांचा प्राण कंठाशी आला आहे. तर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचीही पुरेशी सोय झालेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच दिल्ली, गुजरात, तामिळनाडूमध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तमिळनाडूमध्ये १० हजार ७२३ नवे रुग्ण, गुजरातमध्ये १० हजार ३४० नवे रुग्ण, तर दिल्लीत तब्बल २५ हजार ४४६ रुग्ण सापडले आहेत.