कामठीत रेमडेसिवीरचा काळाबाजार; डॉक्टरला रंगेहात केली अटक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : कामठीच्या खासगी रुग्णालयात डॉ. लोकेश शाहू यांना गुरुवारी (१५ एप्रिल) पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहात पकडले. डॉ. शाहू आशा हॉस्पिटल व छत्रपतीनगरातील एका खासगी रुग्णालयात काम करतात. ते कोणत्या रुग्णालयाकरिता काळाबाजारीचे काम करीत होते, याचा तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील एका परिवाराला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यांनी नागपुरात शोध घेतला असता मिळाले नसल्याने त्यांना कोणीतरी कामठीत डॉ. शाहू यांच्याकडे इंजेक्शन मिळू शकते, अशी माहिती दिली. यानुसार त्यांनी डॉ. शाहू यांच्याशी संपर्क साधून दोन रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. यावेळी त्यांना २७ हजार किंमत सांगण्यात आली. यानंतर पीडित परिवाराने आॅनलाईन २0 हजार पेमेंट केले. आणि नगदी सात हजार घेऊन इंजेक्शन खरेदी केले. याची माहिती अन्य व्यक्तीला लागल्याने त्यांनी या व्यवहाराबाबतची पोस्ट सोशल मीडियावरून जगजाहीर केली. पोस्टवर उलटसुलट चर्चांना पेव फुटल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी बनावट ग्राहक डॉ. शाहू यांच्याकडे पाठवून दोन इंजेक्शन प्रत्येक १६-१६ हजारांमध्ये खरेदी करण्याचे कबूल केले. दुसरीकडे एफडीएला याची सूचना देऊन डॉ. लोकश शाहूला काळाबाजारातील रेमडेसिवीर इंजेक्शन देताना रंगेहात पकडून अटक केली.

