Home नागपूर रक्तरंजित अशांत अस्वस्थ बस्तर : कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

रक्तरंजित अशांत अस्वस्थ बस्तर : कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8057*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

316 views
0

रक्तरंजित अशांत अस्वस्थ बस्तर 

लेखक : कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

 

छत्तीसगढ राज्य स्थापन झाल्यापासून रायपूरमधे काँग्रेसची दोन  आणि बीजेपीची तीन  सरकार आलीत. त्याच काळात केंद्रात अटल बिहारी बाजपेयी,मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी हे एनडीए/युपीए सरकारचे पंतप्रधान होते/आहेत.या सर्व कालखंडात; नक्सल प्रश्न सोडवण्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीची विश्वसनीयता,नक्सल्यांना मिळणार राजाश्रय,नक्सल्यांची “रॉबिनहुड” प्रतिमा,त्यांना समाजाच्या विवक्षित विचारवंतांचा/बाह्य शक्तींचा मिळणारा सर्वंकष पाठींबा आणि “आधी नक्सली नृशंसतेच मूळ शोधण आवश्यक आहे;कराव्या लागणाऱ्या कारवायांबद्दल नंतर बोलू” या विचारसरणीत; गेल्या चौपन्न वर्षांमधे काडीमात्र बदल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर; चुकीची/अर्धवट माहिती,पोलिसांच कमी दर्जाचे प्रशिक्षण, हत्यार संसाधनांची कमतरता,कमकुवत नेतृत्व हे चघळून चोथा झालेले विषय बाजूला ठेवत; शहीद जवानांच शौर्य आणि बलिदानाची पूर्ण जाणीव ठेऊन;बस्तरमधे झालेल्या नवीनतम नक्सली हल्ल्याच्या गाभ्याला हात घालणारी मिमांसा होण आवश्यक आहे.

१७ मार्च,२०२१ला नक्सल्यांनी केंद्र/छत्तीसगढ सरकारसमोर एका प्रसध्दी पत्रकाच्या माध्यमातून,”जनतेच्या भल्यासाठी ते  बातचीत/वाटाघाटी करायला तयार आहेत” असा शांती प्रस्ताव ठेवला होता. मात्र यासाठी सुरक्षादलांना छत्तीसगढमधून पूर्णतः हटवणे/काढणे,नक्सली/माओवादी संघटनांवरील सर्व प्रकारची बंदी मागे घेणे आणि अटकेत असलेल्या सर्व नक्सल्यांची बिनशर्त सुटका करणे या अटी पूर्ण झाल्यावरच बोलणी सुरू होतील अशी शर्त त्यांनी  ठेवली. छत्तीसगढ/केंद्र सरकारनी अंगिकारलेली प्रशासकीय धोरण पद्धती या ऑफरवर काय निर्णय घेते/देते याची वाट न पाहाता नक्सल्यांनी २३ मार्च आणि ०२/०३ एप्रिलला बस्तरमधे रक्तरंजित हैदोस घातला.हल्ल्यानंतर;कोब्रा बटालियनचा जखमी कॉन्स्टेबल, नेत्रकोट,जम्मू निवासी,राकेश्वर सिंग मनहासला नक्सली बंदी बनवून घेऊन गेले. प्रसारमाध्यमांना त्यांनी आधी फोनवरून आणि नंतर दोन पानी पत्राद्वारे  याची आणि नव्या शांती प्रस्तावाची माहिती दिली. राकेश्वरनी नोकरी सोडून काश्मिरमधे परत जायच आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आडकाठी करायची नाही या अटीवर त्याला सोडण्याची तयारी नक्सल्यांनी दर्शवली आहे.याच बरोबर लुटलेल्या १४ रायफल्स,२००० काडतूस आणि इतर समानाचा फोटो प्रसामाध्यमांना दिला आहे. त्यांच्या दोन्ही मागण्यांवर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

शुक्रवार,०२ एप्रिल,२०२१ला;छत्तीसगढमधील सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ),कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ऍक्शन),डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ), सहा जॉईंट टीम्सनी;बिजापूरमधील  तारेम (७६० पोलीस),उसूर (२०० पोलीस) व पामेड (१९५ पोलीस) आणि सुकमामधील मिनपा (४८३ पोलीस)  व नरसापूरम (४२० पोलीस) या पोलीस ठाण्यांमधून एकूण २०५९ पोलीसांनी; नक्सली गढ असलेल्या दक्षिण बस्तर जंगलांतील नक्सल विरोधी अभियानासाठी कूच केल.या सहा टीम्स पैकी, डीआरजी व एसटीएफ जवान असलेली एक आणि डीआरजी व कोब्रा जवान असलेली दुसरी टीम ०२ एप्रिलला रात्री दहा वाजता,तारेमपासून १०-१२ किलोमीटर दक्षिणेला असलेल्या अलीपूडा आणि जोनागूडा एरियात पाठवण्यात आली.याच दोन टीम्सवर योजनाबद्ध घाती हल्ला झाला.

बिजापूरपासून जवळपास ७५ किलोमीटर दूर असलेल्या तारेम क्षेत्रातील सिलगेर गावामधे नक्सली बटालियन नंबर वनचा कुख्यात कमांडर मडावी हिडमा,त्याची सहकारी सुजाथा आणि इतर लष्करी सहकाऱ्यांसोबत लपून बसला आहे अशी पक्की खबर मिळाल्यामुळे सर्व संमती समन्वयानी या हल्ल्याची योजना बनवण्यात/आखण्यात आली होती अस पोलीस म्हणतात. हिडमाला पामेड,कोनटा,जगरगुंडा आणि बसगुडा एरिया कमिटीच्या नक्सली प्लॅटून्सची मदत मिळाली होती. त्याच वेळी दुसरा मोठा नक्सल लीडर चंद्रण्णा आपल्या ६०-७० नक्सल्यांसमेत बिजापूरमधे आला होता.नक्सल्यांनी बिजापूर,सुकमा आणि कांकेर इलाक्यात ठाण मांडल.मडावी हिडमा,नक्सल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमीटीचा मिलिटरी कमांडर आहे.झीरम, बुरकपाल,सुकमासारख्या २६ नृशंस नक्सली हल्ल्यांचा तो योजक/करता करविता आहे/होता. गनिमी युद्धाच प्रशिक्षण त्यानी फिलिपिन्समधे घेतल असून नक्सली टीसीओसीची  रणनीती आखून क्रियान्वित करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याच्यावर ५० लाखांच इनाम घोषित आहे.अशा कुख्यात नक्सल्याच्या या बाले किल्ल्यात पोलीसांनी शुक्रवारी सर्व तयारीनिशी प्रवेश केला.

नक्सली दर वर्षी जानेवारी ते मे महिन्यांत टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह (टीसीओसी) चालवतात. नवीन भरती झालेल्या रिक्रूटांना सुरक्षादलांविरुद्ध प्रत्यक्ष गनिमी युद्धाच प्रशिक्षण या काळात देण्यात येत. त्यासाठी;रस्त्यांवर इम्प्रोव्हाइझ्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) पेरणे,रस्त्यांवरून जाणाऱ्या खाजगी/ पोलीस वाहनांना उडवणे,पोलीस ठाण्यांवर हल्ला करणे,पोलीस पेट्रोल पार्टीसाठी एँबुश लावणे, पेट्रोल पार्टीवर फायर करणे आणि मोठ्या गनिमी युद्धाचा सराव; या काळात करण्यात येतो.त्यामुळे अतिशय पक्की खबर असल्याशिवाय पोलीस पार्टी या काळात जंगलात जायच धाडस करत नाहीत. मागील बारा वर्षांमधे टीसीओसी काळात;०६ एप्रिल,२२०१०ला ताडमेंटलामधे ७६ सीआयपीएफ जवान,२५ मे,२०१३ला झीराम घाटी हल्ल्यात ३० काँग्रेसी नेते आणि सात कोब्रा जवान,११ मार्च,२०१४ला टहकवाडा हल्ल्यात १५ सीआरपीएफ/ पोलीस जवान,१२ एप्रिल,२०१५ला दर्भामधे १७ सीआरपीएफ जवान,०१ मार्च,२०१७ला भेज्जी यथील हल्ल्यात ११ सीआरपीएफ जवान,०६ मे,२०१७ला कसालपाडा ,सुकमात १४ सीआरपीएफ/ डीआरजी जवान,मे ,२०१७ला बुरकापाल बेस कॅम्पववरील हल्ल्यात ३२ सीआरपीएफ जवान आणि २१ मार्च,२०२०ला मिनपा,सुकमात १७ सीआरपीएफ/पोलीस जवान; शहीद झाले आहेत.ही ताजी घटना व्हायच्या आधी नक्सल्यांनी;२३ मार्च,२०२२१ला नारायणपूरमधे पोलिसांची बस उडवून पाच जवानांना शहीद केल होत.त्याचा दहा दिवसांमध्येच हा हल्ला झाला. प्रत्येक वर्षी टीसीओसी दरम्यान मोठा नक्सली हल्ला होतो याची कल्पना/अनुभव असूनही,हिडमानी तो या क्षेत्रात आला आहे याची खोटी बातमी/इंटलिजन्स प्रसारित करताच पोलीस त्याच्या जाळ्यात कसे अलगद अडकलेत हे अगम्य आहे.

शनिवार,०३ एप्रिलला  जंगल सर्चिंग करून परततांना ज्यावेळी तारेम ठाण्यातील जॉईंट टीम,दुपारी बाराच्या सुमारास जंगलात असलेल्या पोवर्ती गावाजवळ पोचली त्यावेळी असतां, पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या  (पीएलजीए) अंदाजे ३०० ते ४०० नक्सल्यांनी योजनाबद्ध घात लावून (प्लॅन्ड अँबुश) हल्ला केला.अँबुशच्या वेळी पोलीस पोवर्ती ते जोनागुडा या दोन किलोमीटर एरियात फैलले होते.या पुढच वर्णन,सी सिक्स्टी पोलिसांना प्रशिक्षण देत असतांनाचा स्वानुभव,प्रसार माध्यमांमधील बातम्या आणि जबाबदार लोकांशी चर्चा करून उमजलेल्या/स्पष्ट झालेल्या  चित्रानुसार  केल आहे. या ऑपरेशन दरम्यान  खरच काय झाल ते प्रशासकीय चौकशीत (डिपार्टमेंटल कोर्ट ऑफ इन्क्वायरी) पूर्णपणे स्पष्ट होईल.

नक्सली रस्त्याच्या बाजूला असलेल्या पहाडीवर,बाणाच्या टोकासारख्या पोझिशनमधे (व्ही  शेप)  बसले होते. येणारी तुकडी सपाट,खुल्या जमिनीवर होती. पोलीस त्यांच्या हत्यारी माऱ्याच्या टप्यात येताच नक्सल्यांनी; रायफल्स,बायोनेट्स आणि देशी रॉकेट लॉंचरनी ‘एम्ड फायर’ सुरु केल.नक्सल्यांच्या फायर पासून वाचण्यासाठी पोलीसांना झाडांमागे आडोसा घ्यावा लागला. सुरवातीला आश्चर्यचकीत झालेल्या पोलीसांनी नंतर पोझिशन घेऊन जबाबी फायर सुरु केल.जवळपास पाच सहा तास चाललेल्या या धुमश्चक्रीत २३ जवान शहिद झालेत,३७ गंभीर जखमी झालेत आणि एक बेपत्ता/लापता  आहे. या २३ शहीदांमधे डीआरजीचे आठ,एसटीएफचे सहा,कोब्राचे आठ आणि बस्तर बटालियनचा एक जवान आहे.  गंभीर जखमी जवानांना वायुसेनेच्या एमआयजी १७ हेलिकॉप्टर्सनी रायपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आल. इतरां साठी नऊ रुग्णवाहिका समेत मेडिकल बॅकअप पार्टीला पाठवण्यात आल.डीजी सीआरपीएफनुसार; किमान २५ नक्सली यात घटनेत मारल्या गेलेत या व्यतिरिक्त ३०-४० जखमी झाले आहेत.जखमी नक्सल आणि नक्सल मृतांची पार्थिव,नक्सली दोन/तीन  टॅक्टर्समधे भरून घेऊन गेलेत.

बिजापूर चकमकीमुळे छत्तीसगढ पोलिसांच्या रणनीती क्रियान्वयनावर परत एकदा प्रश्नचिन्ह उभ झाल आहे.हिडमा आणि त्याचे नंबर वन बटालियनमधील सहकारी, या टीसीओसी दरम्यान पोलिसांना केंव्हा गाठतो याची संधी शोधत असणार. याच हिडमाच्या शोधात निघालेल्या पोलीस पार्ट्या,अलगद त्याच्या जाळ्यात अडकल्या. हे जवान ”बॅटल हार्डन्ड” असल्यामुळे त्यांनी ,जवळपास ४०० नक्सल्यांनी लावलेल्या तगड्या एँबुशमधे फसल्यानंतरही अतिशय शौर्यानी लढा  दिला. तस नसत तर शहीद जवानांच्या संख्येत फार मोठी वृद्धी पाहायला मिळाली असती.या वर्षी नक्सल्यांनी बस्तरमधे जॉईंट मिलिटरी कमांडची स्थापना केली असून ते मोठ्या संख्येत तारेममधे आले आहेत हे पोलिसांना माहिती होत.तारेम क्षेत्र हा नक्सली बालेकिल्ला आहे. तेथे पोचण हे देखील कठीण असत/आहे. या इलाक्यात आपला कॅम्प स्थापन करून  नक्सल्यांनी पोलिसांना खुल आव्हान दिल.नक्सली हाय कमांड प्रतिहल्ला करण्याची संधी शोधत होत. अशा परिस्थितीत,या जमावड्याची माहिती मिळताच लगेच त्या कॅम्पवर हल्ला व्हायला पाहिजे होता. पण छत्तीसगढमधे नक्सलविरोधी कारवायाची आखणी/योजना बहुदा रायपूर/दिल्लीत बनत असावी. म्हणूनच जमावड्याची माहिती मिळताच,त्वरित कारवाई न होता,वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहिल्या गेली आणि त्या अवधीत मडावी हिडमानी आपली पोझिशन बळकट (कन्सॉलिडेट) केली.जमावड्याची माहिती मिळाल्यानंतर पाच दिवसांनी पोलीस कारवाईसाठी बाहेर पडलेत त्या वेळी नक्सली आपली हत्यार पजारून त्यांच्या स्वागतासाठी तयार होते.

पोलिस आधी पामेड क्षेत्रात अभियान चालवणार होते. पण बिजापूर सुकमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नक्सली जमा झाले आहेत याची खबर मिळाल्यावर जोनागुडात ऑपरेसेशन लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.मडावी हिडमाला मारण्या/पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्री जंगलात प्रवेश केला.सर्च ऑपरेशन संपवून परत येतांना जवानांच्या सामरिक खबरदारीचा बुरखा गळून पडला/सैल झाला असणार.छोट्या छोट्या ग्रुप्समधे,सुरक्षित अंतर ठेऊन मार्च करण्या ऐवजी ते एकत्र होत (बंचिंग ऑन मार्च) वाटचाल करत असल्यामुळे ते नक्सली अँबुशमधे  अडकले असणार. नक्सली त्यांच्या मुव्हमेंट्स ट्रॅक करताहेत ही बातमी ड्रोन्सद्वारे हेडक्वार्टरला आणि त्यांच्याकडून जंगलात परतीचा मार्च करत असलेल्या पोलिसांच्या कॉलम्सना मिळेपर्यंत उशीर झाला होता.पहिली गोळी येताच पोलिसांनी मोर्चा सांभाळला पण नक्सल्यांनी टेकड्यावर आणि मैदानात व्ही  शेपमधे  अँबुश लावली होती ज्यात जवान आत येऊ शकले पण एका विवक्षित ठिकाणी पोचल्यावर त्यांना पुढे/मागे  जाण शक्य नव्हत.नक्सल्यांनी अत्याधुनिक हत्यारां सोबतच गावठी हत्यारांनी पोलीसांवर गोळाबारूद फेकणे सुरु  केल.काय होत आहे हे लक्षात येईस्तोवर मार्चिंग कॉलममधील जवान मृत्युमुखी पडले/जखमी झाले. फायरमधे जखमी झालेल्या सहकाऱ्यांना गावाकडे नेत असतांना,पोलीसांवर त्या गावातून एलएमजी आणि रॉकेट लॉंचरद्वारे द्वारे जलदगती फायर केल्या गेल.पोलीस सर्चसाठी जंगलात गेल्यानंतर नक्सल्यांनी रात्रीच्या रात्री अँबुश जागे जवळच्या  टेकडीवरील जोनागुडा  आणि जिरागाव खाली करवलीत आणि तेथील घरांमधे  दबा धरून बसलेत.त्या दोन्ही  गावात, नक्सल्यांसाठी काम करणाऱ्या  जन मिलिशियाचे लोक राहात नसते तर हे सहज शक्य झाल नसत.

२५/२६ मार्चला; सिलगेरमधे ६०/७० आणि बोडागुडात ४०/५० नक्सली आले असल्याची माहिती पोलिस खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर आणि छत्तीसगढ स्टेट इन्फर्मेशन ब्युरो/पोलिसांनी दंतेवाडा नजदिकच्या टेकड्यांवर उभारलेल्या इंटरसेप्टर रिसिव्हर्समधून मिळालेल्या इंटलिजन्सद्वारे त्याची पुष्टी झाल्यानंतर, ह्या  ऑपरेशनची आखणी करण्यात आली.पण धोरणकर्ते बहुदा हे विसरलेत की नक्षली खोट्या माहितीची (डीकॉय इन्फर्मेशन) देवाणघेवाण करून पोलिसांना जाळ्यात अडकवू शकतात.दूसर म्हणजे हे ऑपरेशन प्लॅन होत असतांना; डीजी,सीआरपीएफ,कुलदीपसिंग; एडीजी सीआरपीएफ,झुल्फिकार हसन; आयजी ऑप्स, नलीन प्रभात;छत्तीसगढ डीजीपी डीएम अवस्थी हे फोर्स लॉन्च होण्याच्या ठिकाणांवर, हेलिकॉप्टर/ एस्कॉर्ट कॉन्व्हॉयमधे, ये जा करत असणार/होते. ज्यावेळी २००० पोलीस ऑपरेशनसाठी बाहेर पडतात आणि इलाक्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आवागमन वाढत त्यावेळी पोलिसांच्या मुव्हमेंटची इथंभूत बातमी मिळवण आणि त्याच पृथक्करण करण हडामी सारख्या बॅटल हार्डन्ड नक्सल्यासाठी अगदी सोप असत.या वेळी हेच झाल असणार.म्हणूनच  जे मिळवण्यासाठी (हडामी) ऑपरेशन लॉन्च झाल ते तर  पोलिसांना मिळाल नाही पण ज्या प्रकारे नक्सल्यांनी अँबुश लावली त्यावरून,नक्सल्यांना पोलीसांच्या मुव्हमेंट्सची नक्की/पक्की माहिती त्यांच्या खबऱ्यांकडून/त्याच्यापाशी असलेल्या पोलीस रेडिओ सेट्सवर मिळाल्यामुळे,त्यांनी पोलिसांना कस विनासायास आपल्या किलिंग ग्राउंडमधे खेचल याची कल्पना करता येते.अशा वेळी महाराष्ट्राचे सी सिक्स्टी आणि/किंवा आंध्र प्रदेशचे ग्रे हाऊंड प्रमाणे, भरवशाच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीवर आधारित (सॉलिड ह्युमन  इंटलिजन्स) ,छोट्या चमूंद्वारे  कारवाया केल्या पाहिजे. अन्यथा: छत्तीसगढमधे; महत्वाकांक्षी कारवाई,पोलिसांच शहीद होण आणि शस्त्रांची लूट हा खेळ या पुढेही सुरूच राहील.

सर्वात महत्वाच म्हणजे; नक्सल्यांनी कारवाई करून परतणाऱ्या जवानांना आपल्या जाळ्यात ओढून तुफान,अंदाधुंद फायर केल,त्यात काही मृत पावले,काही जखमी झाले असतील,काहींना लढण्यासाठी सोडून बाकीचे जवान तारेम ठाण्यात सुखरूप कसे परत आलेत याची चौकशी झालीच पाहिजे.०३एप्रिलला रात्री,पाच जवान शाहिद आणि १८ लापता अशी स्थिती होती. याचा अर्थ बाकीच्यांनी,मृत आणि जखमींना,अँबुश साईटवर,देवाच्या हवाली केल/ वाऱ्यावर सोडल असा होतो.म्हणूनच नक्सल्यांना मृत/जखमींची शस्त्र,गणवेश,सामान लुटण्याची आणि पार्थिवांना अमानुषपणे म्युटिलेट करण्याची  संधी मिळाली. पूर्ण रात्र त्यांनी जखमींचा नृशन्स छळ केला असणार.तारेमपासून १०-१२ किलोमीटर दूरवर ही नक्सली कारवाई झाली. कॅम्पच्या इतक्या जवळ ३००/४०० नक्सली आलेत आणि खबरी/ड्रोन्सना याची  भनकही लागली नाही हे सुद्धा अगम्य आहे. यांचा अर्थ,कॅम्पमधे कोणी नक्सली खबऱ्या होता/आहे असा होतो. तो कोण याचीही चौकशी झाली पाहिजे. नक्सली टॅक्टिक्स पोलिसांच्या तुलनेत  वरचढ आहे का,असेल तर का आहे,पोलीस नक्षल्यांची सामरिक बरोबरी का करू शकत नाही याचीही प्रांजळ समीक्षा होण आवश्यक आहे.

या आधी प्रत्येक वेळी, पोलिसांच्या मुव्हमेंटची बारीक सारीक माहिती नक्सल्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून कळते पण स्थानिक लोक नक्सल्यांबद्दल  पोलिसांना काहीच सांगत नाहीत हे प्रत्ययाला आल आहे. याचा अर्थ,टोटल इंटलिजन्स फेल्युअर असा नसून,प्रत्येक वेळी पोलीस,मिळालेल्या रद्दड/कुचकामी इंटलिजन्सच्या आधारे आखण्यात आलेल्या, सामरिकदृष्ट्या फुसक्या कारवायांमधे पाठवले जातात आणि त्यात मोठी जीव हानी होते असा होतो. ”लेट अस फिनिश नक्सल्स अँड नक्सलीझम इन वन सिंगल मास्टर स्ट्रोक” किंवा “तामिळ फिल्म ‘पेरनमई’ किंवा त्याच हिंदी डबिंग ‘कसम हिंदुस्तानकी’  या सिनेमांमधे दाखवल होत त्या प्रमाणे काही सुपर कमांडोंना जंगलात पाठवून नक्सल्यांचा नायनाट करा” असा नारा,या  नवीनतम नक्सली हल्ल्यानंतर प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर बुलंद होतो आहे. काही लोक “एरियल बॉम्बिंग,स्ट्रॅफिन्ग,सेटिंग फायर टू जंगल्स,प्लांटिंग वाइल्स बग्ज इन् एव्हरी आदिवासी हाऊसहोल्ड,फॉलोइंग गढ़चिरोली/आंध्रा  मॉडेल, कोव्हर्ट ऑपरेशन्स,आईज इन द स्काय” अशा स्कीम्सची भलावण करतात. पण या पैकी एकानेही बस्तर कस आहे हे नकाशातही पाहिल नसेल हे पैजेवर सांगता येईल.

या आधीच्या नक्सली हल्ल्यांची झाली तशीच या घटनेचीही चौकशी होईल.पण अनुभवान्ती खेदपूर्वक म्हणाव लागत की अशा चौकशा (एन्क्वायरी); आवडत्यांना पदरा आड घेण्यासाठी आणि दोषारोपणासाठी बकरा शोधायला केल्या जातात. माजी डीजी,ज्युलियस रिबेरोंनुसार,” मिडल अँड ज्युनियर लेव्हल ऑफिसर्स अँड मेन आर ओब्लाईज्ड टू सरेंडर देअर  ब्रेन्स टू हेअर ब्रेन्ड स्कीम्स ऑफ द लीडरशिप इन नेम ऑफ डिसिप्लिन”. त्याच प्रमाणे “ऑपरेशनमधे मोठ्या प्रमाणावर नक्सली मारल्या गेले आहेत पण नक्सली/त्यांना मदत करणारे गावकरी  ती पार्थिव घेऊन गेलेत” हे ऑपरेशननंतर  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी  साचेबद्ध उत्तर असत. या कारवाईत शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना ८० लाख रुपये आणि कुटुंबातील एकाला सीआरपीएफ मधे नोकरीची ग्वाही  केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली. पण त्यामुळे अशाच कारवायांमध्ये शहादत मिळालेल्या पण एवढ्या सवलती न मिळालेल्या अन्य जवानांच्या कुटुंबियांच्या मनात दुजाभाव व अन्यायाची भावना निम्हण होईल याची जाणीव सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का झाली नाही/होऊ नये हा प्रश्न उभा ठाकतो.

आता तरी अशा घटना परत घडणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासन आणि सरकारनी घ्यायला पाहिजे. घटनेवर भाष्य करतांना शिळ्या कढीला ऊत आणण्या ऐवजी घटनेच्या गाभ्यात डोकावून त्या संबंधी प्रश्न सरकारला विचारण हेच  विपक्ष आणि प्रसारमाध्यमांनी  केलं तर याची पुनरावृत्ती व्हायचे चान्सेस कमी होतील.

 

०७/४/२१ : १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१० : ९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com.