‘आगंतुकाची स्वगते ‘ मातीतल्या माणसांच्या कविता -कीर्ती काळमेघ,वनकर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8023*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

476

‘आगंतुकाची स्वगते ‘ मातीतल्या माणसांच्या कविता

-कीर्ती काळमेघ,वनकर

‘्र१३्र‘ं’ेीॅँ@ॅें्र’.ूङ्मे
मो. 9503213607
कथा,कादंबरीकार,समीक्षक,कवी आणि उत्तम माणूस अश्या अनेक अंगानी संपन्न असलेले व्यक्तिमत्व डॉ. कैलास दौड यांचा नुकताच ‘आगंतुकाची स्वगते’ हा कवितासंग्रह चपराक प्रकाशन पुणे तर्फे प्रकशित झाला. ज्या मातीतआणि मातीतल्या माणसांमध्ये आपण राहतो त्यांच्या एकंदरीतच जगण्याचा आरसा असलेला त्यांचा हा ओळीनं प्रकाशित झालेला पाचवा कवितासंग्रह आहे. आपल्या रोजच्या जगण्यातल्या व्यथा आणि कथा कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करताना जागतिकीकरणानंतरचे भीषण वास्तव डॉ. कैलास दौड यांनी ह्या कवितासंग्रहातून मांडलय. मुळात ज्याची नाळ भूमीशी जुळली असते तोच इतका अस्वस्थ होऊन सभोवतालच्या सामाजिक, कौटूंबिक, भावजीवन आणि त्याला वेढलेल्या प्रश्नावर प्रगल्भपणे लिहू शकतो.
‘ सल आणि ओल’, ‘नदीकाठ’, आणि ‘ दिसमास’ या विभागात कविता विभागल्या गेल्या असल्यातरी सा-या कवितांच्या आशयातून निर्माण झालेली स्वगते मानवी मनाच्या दबलेल्या आवाजाचे दु:खित स्वर उंचावतात आणि कवीच्या वैचारिक प्रगल्भतेचे दाखले देताना काळाच्या पटलावर ह्या कविता किती उल्लेखनीय आहे याचे पदर उलगडतात. आधुनिकतेच्या नावावर झालेले बदल,शेती आणि शेतकरी,बदलते समाजजीवन, राजकीय कल्लोळ, दुष्काळ, नापिकी, पर्यावरण या सगळ्यांचा ग्रामीण जीवनावर होत असलेल्या परिणामाचे बकाल रूप म्हणजे कवी डॉ. कैलास दौड यांची ‘आगंतुकाची स्वगते’  हा कवितासंग्रह.
कधी तरी पडणारा दुष्काळ तर कधीतरी होणारी अतिवृष्टी यामुळे आमचा शेतकरी हवालदिल झालेला आहे. असे असताना सतत त्याच्या समोर सूचनांचे फलक लावले जातात म्हणून ‘ वाचवणं महत्वाचं’ या कवितेतून कवी म्हणतात, आमिषापेक्षा आणि सतत सुचविण्यापेक्षा या मातीतल्या शेतक-याला वाचविण्याची गरज आहे कारण शेतकरी वाचला तरच तुम्ही आम्ही वाचू .
भावाभावनिया केली खाते फोड
बहिणीलाओढ माहेराची
कागदावरती मागितल्या सह्या
नात्याच्या डोहात बुडविल्या वह्या 
काळ बदलत गेला तशी माणसं बदलत गेलीत आणि एकाच उदरातून जन्माला आलेली नाती वैरीण झाली. पैसा,अदला, यात माणसं इतकी गुंतत गेली की नात्यांची माती झाली तरी त्यांना आता पर्वा  राहिली नाही. कधीतरी जिव्हाळ्यानं बहरणारी नाती कोमेजून गेली आहे . घरादारात आणि गावात विषमता आलीय. नाती माती अबोल झालीय आणि स्वार्थापायी घरे विधुर होऊ लागली आहे.
 ‘ बेटं’ या कवितेतून सामान्य माणसाचं आजचं चित्र रेखाटताना कवी म्हणतात. माणसं आता मातीतली राहिली नाही ती आता पोरकी झाली आहे .
” हाआपला तो त्याचा
हवे तसे वाटले जातात
भरून घ्यायला थैली मग
म्होरकेही धावून येतात ”
जाती मातीत माणसं विभागल्या गेली आहे. आम्ही आमच्याच विरोधात उभे राहतोय त्यामुळे गावातली पोरं आणि वारं सारच उधान पिकासारखी झालीय म्हणून कवी आपल्या कवितेतून या भूमिपुत्रांना म्हणतात,
‘जाग जरासा आता
भुईच्या लेकरा तू रे
जाग जरासा आता’’
एकूणच उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे आपल्याच मातीत शेतक-याचं भावविश्व् उध्वस्त होऊ लागलं आहे. .त्याला आता आपल्याच मातीत पाय रोवावे वाटत नाही. तो आपल्याच मातीत पाहूणपणाला आलेल्या पाहुण्यासारखा कवीला वाटतो. हाच पाहुणा शेतकरी कवीला ‘ आगंतुक ‘ वाटतो आणि म्हणून कवी म्हणतात ,
‘गोंदलेल्या मातीवर
बांधाचे चौकोन
तस तसे खुजेझाले
माणसाचे मन ”
तंत्रज्ञान प्रगत होऊ राहिलं तसा माणूस विचारानेही प्रगत झाला . मनं खुजी झाली आणि नाती बधिर झाली. कधीकाळी मातीशी एकनिष्ठ असलेला माणूस आता मातीलाच दुरावला आहे आणि त्याचा विपरीत परिणाम मात्र एकूणच सभोवतालच्या परिस्थितीवर झालाय. पिढ्यानपिढ्या सरकताय पुढे पण परिवर्तनाच्या वाटा कुठे गवसत नाही आहे. बेधुंद होऊन स्वत:ची लक्तरे तोडण्यात सारे मग्न आहे. कशाचा काही अंदाजच लागत नाही म्हणून निसर्गही आता मौन पाळतोय. सभोवतालचा वाढलेला कोलाहल , माणसामध्ये निर्माण झालेल्या द-या, आक्रमक होऊन निघालेले मोर्चे , नात्यांना न मिळणारं खतपाणी आणि दाटलेली उदासीनता ह्या सा-या सभोवतालच्या परिस्थितीला जेव्हा कवी न्याहाळतात तेव्हा जाणिवांची सल कवीला सहन होत नाही आणि म्हणून कवी म्हणतात,
‘‘ कुठं जावं मला सांगता येत नाही
एक मात्र खरं
गाव कुठं जाईल याचा अंदाज कुणाच्याच मनाला येत नाही’’
आपल्या सभोवतालची ही उसवत चाललेली नाती – माती शिवण्यासाठी सुईदोरा घेऊन कवी निघतात या वास्तवाला सांधण्यासाठी आचारामध्ये आणि विचारांमध्ये निर्माण झालेल्या दरीला सुईदो-याने शिवून किनारे जोडण्याचा आशावादी प्रयत्न ‘ सुईदोरा ‘ या कवितेतून कवी करतात . गाव आणि वास्तव मांडत असतानाच कर्मवीर , गाडगेबाबा या सारख्या महामानवांचे दाखले देखील कवी देतात आणि या विश्वातील माणसांना एकीने बाग फुलविण्याचाअट्टाहास करतात. वास्तवाच्या जाणिवेतून रान जन्माला आलेल्या ह्या कवितेविषयी कवी म्हणतात,
‘‘आपलीच सल
आपल्याला खोल
आपल्याच मनाला
कवितेची ओल’’
ओल कुठलीही असो मायेची असो नाही तर कवितेची जिव्हाळ्याचा पान्हा फुटला तर शब्द आपोपाप बाहेर येतात. ओलीस आलेल्या सा-या कविता शब्दांनी नटलेल्या आहेत . या कवितासंग्रहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे चपराक प्रकाशन ने या कवितासंग्रहाचं मोठ्या थाटात प्रकाशन केले असले तरी ज्या मातीतून आणि मातीतल्या माणसांच्या जगण्यातुन कविता जन्माला आल्या त्या शेतकरी मावळ्यांच्या हस्ते एक आगळावेगळा प्रकाशन सोहळा कवी डॉ.  कैलास दौड यांनी संपन्न केला हे विशेष आणि माणूस पणाचा झेंडा आपल्याच मातीत रोवला.
मातीशी आणि माणसांशी जुळलेली नाळ आणि सामाजिक जान यांनी प्रतिबिंबित झालेला हा कवितासंग्रह वास्तवाचं भान सांगणारा आहे आणि म्हणून आपण आपल्यालाच कवितेतून वाचतोय का असा अंदाज कविता वाचताना वाचकाला येतो म्हणून हा कवितासंग्रह अंतरंगाला भेदून जातो.
‘आगंतुकाची स्वगते ‘
लेखक: डॉ. कैलासदौड
प्रकाशन :  चपराक, पुणे
मुखपृष्ठ : प्रमोदकुमारअणेराव
मूल्य : ११० /-