नोकरीसाठी बोलावून वेकोलि अधिका-याने अपमान केला म्हणून विद्यार्थिनीने विष प्राशन करून जीव दिला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7954*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

नोकरीसाठी बोलावून वेकोलि अधिका-याने अपमान केला

म्हणून विद्यार्थिनीने विष प्राशन करून जीव दिला

विदर्भ वतन,प्रतिनिधी-चंद्रपूर : वेकोलिचे बल्लारपूर क्षेत्रीय नियोजन अधिका-यांनी प्रकल्पग्रस्त शेतक-याच्या मुलीला नोकरी देण्यासाठी बोलावून अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे संतप्त झालेल्या या मुलीने घरी जावून विष प्राशन केले. गेले पाच दिवस मृत्यूशी तिची झुंज बुधवारी सकाळी संपली. चंद्रपूर शासकीय रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संताप व्यक्त करीत मुलीच्या नातेवाईकांनी मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयापुढे प्रेतासह ठिय्या दिला. अखेर गावकरी व पोलिसांनी समजूत काढून त्या नंतर प्रेत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
आधीच वादग्रस्त असलेले वेकोलिचे नियोजन अधिकारी पुन्हा या प्रकरणामुळे गोत्यात आले आहेत. संबंधित नियोजन अधिका-यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने निलंबित करावे, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अनेक प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणाची व त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, यासह अनेक मागण्या यावेळी मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी केल्या आहेत.
साखरी येथील तुळशीराम घटे यांची तीन एकर जमीन पोवनी तीन या कोळसा खाणीत अधिग्रहित करण्यात आली. यानंतर सर्व रीतसर होऊन जमिनीची किंमत या परिवाराला मिळाली. नियमानुसार या परिवारातील एकाला नोकरी मिळणार होती. त्यासाठी या जमीनधारकांनी त्यांची मुलगी कुमारी आशा तुळशीराम घटे यांच्या नावाचे संमतीपत्र दिले. सर्व सोपस्कार पूर्ण झाले असतांना अचानक या घटे परिवाराला वेकोलिच्या मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयात बोलविण्यात आले. २२ मार्चला घटे परिवार भेटायला गेला. तेव्हा नियोजन अधिका-यांनी सर्व विचारणा झाल्यावर शेवटी या मुलीला आई विषयी विचारीत अत्यंत अपमानास्पद बोलले. यामुळे भावनाशील, अत्यंत निग्रही व हुशार असलेल्या आशाला खूप वाईट वाटले. यानंतर घरी जाऊन आशा हिने विष घेतले. तिला प्रथम स्थानिक दवाखान्यात व तेथून चंद्रपूर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तब्येत गंभीर झाल्याने शांतीज्योती हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. बुधवारी सकाळी तिला चंद्रपूर जिल्हा शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा अंत झाला. चंद्रपूर येथेच शवविच्छेदन करण्यात आले.
यानंतर दुपारी एक वाजता मुलीचे प्रेत बल्लारपूर सीजीएम कार्यालयापुढे आणण्यात आले. दरम्यान, मुलीचे वडील व काका राजुरा पोलीस ठाण्यात गेले. मात्र तेथे दोन तास बसवून ठेवण्यात आले. नंतर तक्रार घेताना वेगवेगळे अवास्तव प्रश्न विचारून भंडावून सोडले. अखेर मुलीचे वडील तिथून निघून गेले. वेकोलि व पोलिसांचे साटेलोटे असल्यामुळेच पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास त्रास दिल्याचा आरोप मुलीचे वडील तुळशीराम घटे यांनी केला आहे.
यानंतर सीजिएम आॅफिस पुढे मृत मुलीचे वडील, नातेवाईक यांनी प्रेतासह ठिय्या मांडला. यानंतर येथे मोठया प्रमाणात पोलिस कुमक बोलविण्यात आली. चंद्रपूर येथून दंगल नियंत्रण पथक बोलाविण्यात आले. यावेळी मुलीचे नातेवाईक व पोलिसांची झटापट झाली.
शेवटी काही गावक-यांनी व पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर प्रेत अंत्यसंस्कारासाठी सास्ती येथे नेण्यात आले. आपदग्रस्त मुलीच्या वडिलांनी दोषी अधिका-यांवर तातडीने गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे वेकोलिचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. सध्या येथे शांतता असली तरी असंतोष उफाळून येऊ शकतो, अशी स्थिती आहे.