मुंबईतील अग्नीतांडवाला जबाबदार कोण?

363

विदर्भ वतन न्युज पोर्टल – काल मध्यरात्री ड्रीम मॉल आणि सनराईस रुग्णालयात ही आग लागली. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दहा जणांमध्ये दोन कोविड रुग्णांचा समावेश असल्याचीही माहिती मिळत आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल ११ तास लागले.ड्रीम मॉलमधील सनराइझ रुग्णालयात एकूण ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या भीषण आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी ६१ जणांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत अडकलेल्या चार जणांचा अजूनही शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ही आग मॉलच्या चारही बाजूंना पसरली होती. या कारणामुळे बचाव कामात अडथळे येत होते. मात्र, ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आता येथे अग्निशमन दलाचे कुलिंग आॅपरेशन सुरु आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस हॉस्पिटलला लागलेल्या आगीची पाहणी केली. सनराईस हॉस्पिटलला लागलेली आग अत्यंत भीषण आहे. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच आगीला रुग्णालयातील कोण कोण जबाबदार आहेत, त्याचा तपास करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगराळे यांनी सांगितलं.
भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीत सनराइज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. राज्यातील मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये जिथं कुठं कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत, तेथील अग्निसुरक्षेची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत.
दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांशी चर्चा केली. जखमी व इतर कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ड्रीम्स मॉलमधील आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘ही घटना अत्यंत दुदैर्वी असून या प्रकरणाला जबाबादार असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं त्यांनी सांगितलं. कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रुग्णालयाला देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर मी राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेली राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी असे निर्देश देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.