नागपूरचा भावेश चालवणार तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक !

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7809*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

233

नागपूरचा भावेश चालवणार तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक !

-‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स’ मध्ये नाव नोंदविण्याचा निर्धार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : नागपूरचा युवा बाईक रायडर भावेश साहू ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स’ मध्ये नाव नोंदविण्याच्या उद्देशाने येत्या २८ ते ३१ मार्च या दरम्यान ३ दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक चालविणार आहे. या साहसी अभियानाच्या निमित्ताने तो भारतीयांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा सामाजिक संदेश सुद्धा देणार आहे. २४ वर्षीय भावेश ६ हजार किमी अंतराच्या गोल्डन कॉड्रलॅटरल चतुष्कोण नावाच्या या अभियानाची सुरुवात होळीच्या पर्वावर भारताची राजधानी दिल्ली येथून २८ मार्चला दुपारी १२ वा. प्रारंभ करणार आहे. त्यानंतर कोलकाता, चेन्नई, मुंबई मार्गे दिल्ली येथे अभियानाची समाप्ती होईल. हे अंतर ७५ तासांच्या आत पूर्ण करुन नवा विक्रम नोंदविण्याचा त्याचा ठामपणे विश्वास आहे. या दिवसरात्र प्रवासादरम्यान तो कुठेही मुक्काम न करता तब्बल १३ राज्यांतील एकूण ८२ शहरांमधून बाईकने जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, खाणेपिणेही तो चालत्या बाईकवरच करणार आहे. यावेळी तो सेफ्टी गिअर, सूट व जीपीएस सिस्टीमची मदत घेणार आहे. भावेश साहू ने या अभियानासाठी ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंदणी केली असून, अभियान पूर्ण झाल्यानंतर त्याच्या विक्रमाची नोंद होणार आहे. यापूर्वीचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर आहे. तो विक्रम मोडीत काढण्याचा भावेशला पूर्ण विश्वास आहे. १६ वर्षा पासूनच त्याला बाईक चालविण्याचा छंद होता. एमबीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने यापूर्वी भूतान, लद्दाख, नेपाळ, म्यानमार बॉर्डरपर्यंत बाईक राईड केले आहे. लिम्का बुकचा विक्रम मोडण्यासह जनजागृती करणे, हाही या अभियाना मागचा त्याचा उद्देश आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व नियमित हेल्मेटचा वापर करावा, असा संदेश तो जागोजागी पोहोचविणार आहे. बाईक रायडर भावेश साहू सांगतो कि हे अभियान माझ्यासाठी फार मोठे आव्हान असून, ‘स्टॅमिना’ची परीक्षा घेणारे आहे. राईड निर्धारित वेळेत पूर्ण करून ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स’ मध्ये नाव नोंदविण्याचा माझा हेतू व प्रयत्न राहणार आहे. त्यात मी यशस्वी होईल, अशी मला खात्री आहे.’