
विदर्भ वतन न्युज पोर्टल, मुंबई: तटरक्षक दलाने अरबी समुद्रात कारवाई करून मोठ्या घातपाताचा डाव उधळला. संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ४९०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, एके ४७ रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही कारवाई करण्यात आली. तटरक्षक दलाच्या वरळीत मुख्यालय असलेल्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरूवारी मोठी कारवाई केली. याद्वारे संशयित नौकेला घेरून त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी नौकेमध्ये तब्बल ४९०० कोटी रुपयांचे १६०० किलो अंमली पदार्थ सापडले. याशिवाय पाच एके ४७ रायफल तसेच १ हजार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. समुद्री संरक्षण मोहिमेंतर्गत समुद्री तसेच हवाई समन्वयाने ही कारवाई केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही थरारक कारवाई करण्यात आली.तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत असताना तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. यामुळे दलाच्या गस्ती नौकांनी तात्काळ हवाई टेहळणी विभागाला माहिती दिली. टेहळणी विमानाने आकाशात घिरट्या घालून संबंधित नौकांबद्दल अधिक माहिती तसेच नेमके ठिकाण गस्ती नौकेला कळवले. यानुसार गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला. मिनी कमांडो मोहीम राबवत नौकेचा ताबा घेतला व तपासणी केली. तीनपैकी ह्यरवीहंसीह्ण ही श्रीलंकन मच्छिमार बोट अमली पदार्थ व रायफल घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत होती. अन्य दोन नौका तिला संरक्षण पुरवत होत्या. तिन्ही नौकांसह त्यावरील १९ खलाशांना तटरक्षक दलाने ताब्यात घेत मोठ्या घातपाताचा कट उधळला.

