
बसला धडकली आॅटोरिक्षा, 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू;
भीषण अपघाताने मध्यप्रदेश हादरले
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे आज सकाळी अत्यंत भयंकर अपघात झाला. आॅटो रिक्षाने बसला दिलेल्या जोरदार धडकेत एकूण 13 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये 12 महिलांचा समावेश होता. या सर्व महिला अंगणवाडीत स्वयंपाक बनविण्याचं काम करत होत्या. या घटनेमुळे मध्यप्रदेश हादरून गेला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
आज सकाळी हा भीषण अपघात झाला. ग्वाल्हेरच्या मुरार क्षेत्रामध्ये एक बस आणि रिक्षाची धडक झाली. त्यात रिक्षात असलेल्या 12 महिलांचा आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या महिला अंगणवाडीत स्वयंपाक करण्याचं काम करत होत्या. काम संपवून त्या दोन रिक्षाने घरी परत होत्या. मात्र, एक रिक्षा रस्त्यातच बंद पडल्याने या सर्व महिला एकाच रिक्षात जाऊन बसल्या. मात्र रिक्षा पुढे जाताच या रिक्षाने समोरून येणा-या बसेसला जोरदार धडक दिली. या घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करण्याचं काम सुरू केलं आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या : दरम्यान, या दुर्देर्वी घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाच्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दु:ख झालं. ईश्वर मृतांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असं चौहान यांनी म्हटलं आहे. तर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत वेदनादायी बातमी आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने सर्वोतोपरी आर्थिक मदत करावी. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा, अशी मागणीही कमलनाथ यांनी केली आहे. Ñ

