Home Breaking News सहमतीतील संबंध कालांतराने बलात्कार ठरू शकत नाही

सहमतीतील संबंध कालांतराने बलात्कार ठरू शकत नाही

0
सहमतीतील संबंध कालांतराने बलात्कार ठरू शकत नाही

सहमतीतील संबंध कालांतराने बलात्कार ठरू शकत नाही

-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला निर्णय

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : दोघांच्याही सहमतीने तरुण आणि तरुणींमध्ये निर्माण झालेले शारीरिक संबंध कालांतराने बलात्कार ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले नव्हते. तरीही संबंध प्रस्थापित केले याचा अर्थ दोघांचीही परवानगी असल्याने हा बलात्कार ठरत नाही, असा निवार्ळा न्यायालयाने दिला आहे.याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
अकोला जिल्ह्यातील अकोलखेड (ता. आकोट) येथील रहिवासी पवन गणेश चौरागडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात २0१९ मध्ये अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका तरुणीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीवर परतवाडा पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम ३७६(एन) (दोन), ४१७ व अँट्रासिटी अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका पवन चौरागडे याने नागपूर खंडपीठात दाखल केली. २0१२ मध्ये एका विवाह समारंभात दोघांची भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिले. यानंतर त्यांचे प्रेम फुलले व परतवाडा येथे त्यांचे पहिल्यांदा शारीरिक संबंध निर्माण झाले. बरेच वर्षे त्यांचे संबंध राहिले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, अशी तक्रार पीडित तरुणीने केली. घटनेनंतर सात वर्षे उशिराने तक्रार करण्यात आली तसेच संबंध हे दोघांच्याही सहमतीने होते, असा युक्तीवाद करण्यात आला. हा युक्तिवाद आणि या प्रकरणातील तथ्य तपासून न्यायमूर्तीद्वय झेड.ए.हक व अमित बोरकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय दिला.पवन चौरागडेतर्फे अँड. अजय मदने यांनी बाजू मांडली.