Home Breaking News सुट्टीत घरी आली नात, आजोबाने केला घात…

सुट्टीत घरी आली नात, आजोबाने केला घात…

0
सुट्टीत घरी आली नात, आजोबाने केला घात…

अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याप्रकरणी आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, यवतमाळ : निराधार अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याप्रकरणी आजोबाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहीउद्दीन यांनी आज हा निकाल दिला असून २२ आॅक्टोबर २0१९ रोजी घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे हा प्रकार उघडकीस आला होता.
या प्रकरणातील पीडिता (११) ही आपल्या आजीजवळ राहत होती. तिचे आईवडील मरण पावले होते. पीडितेचे वडिल जिवंत असतांना आजोबा हे मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथे राहत होते. उन्हाळाच्या शाळेच्या सुट्या लागल्यावर पीडिता व तिची लहान बहिन आरोपी आजोबाकडे १ महिन्यासाठी राहायला गेली होती. तेथे नराधम आजोबाने अल्पवयीन नातीवर एक दिवस आड अत्याचार केले. तसेच कोणालाही सांगू नको असे त्याने धमकावून ठेवले होते. पीडिता बहिनीसह पुन्हा घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे वडिलासोबत राहायला आल्यानंतर काही महिन्यांनी वडिल मरण पावले. त्यानंतर नराधम आजोबा सुध्दा बेलोरा येथे राहावयास आला. तेथे पण त्याने नातीवर अत्याचार केले. यातून अल्पवयीन पीडीतेला गर्भधारणा झाली. १५ आॅगस्टच्या झेंडावंदन कार्यक्रमात पीडिता चक्कर येऊन पडल्याने गावातील सरपंच व आजींनी विचारपुस केली असता आजोबाने केलेल्या गैरकृत्याची माहिती दिली. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी आजोबा विरुध्द गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यामध्ये जिल्हा न्यायाधीश एम.मोहिउद्दीन यांच्या न्यायालयात सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने पोक्सोमध्ये आमरण जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. नितिन दवे यांनी काम पाहिले.